मंत्रालयातील वरिष्ठांचे आशीर्वाद आणि आयुक्तांची मर्जी या भांडवलावर एखादा दुय्यम अधिकारीही पालिकेतील सत्तेच्या चाव्या आपल्या हाती कशा ठेवू शकतो, हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सहाय्यक आयुक्त गणेश बोराडे याला अटक केल्यानंतर उघड झाले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जाळ्यात सापडलेला बोराडे हा महापालिकेतील गेल्या अठरा वर्षांतील अठरावा अधिकारी असून आणखी पाच अधिकारी रडारवर असल्याचे समजते.  
महापालिकेत आरोग्य निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेला गणेश बोराडे नंतर बाजार परवाना निरीक्षक, मुख्य निरीक्षक, प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि आता सहाय्यक आयुक्त व अनुज्ञापक अधिकारी म्हणून कार्यरत होता. मंत्रालयातील एका सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याशी असलेल्या सलगीचा फायदा घेऊन त्याने एका माजी आयुक्ताची मंत्रालयातील सर्व कामे करून दिली. त्याची परतफेड म्हणून त्याने प्रशासनाकडून ‘दुभते’ पदभार पदरात पाडून घेतले. बोराडे याच्या ११ तक्रारी प्रशासन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
जुलै २०१२ आणि एप्रिल २०१३ मध्ये गणेश बोराडे याच्या भ्रष्ट कारभाराविषयी नगरसेवक श्रेयस समेळ, उषा वाळंज यांनी सभा तहकुबी मांडल्या होत्या, पण तत्कालीन महापौर वैजयंती गुजर यांनी अनधिकृत बांधकामांविषयीच्या १९ पैकी १४ लक्षवेधी सभागृहात चर्चेलाच येऊ दिल्या नाहीत. विद्यमान महापौर कल्याणी पाटील यांनीही बोराडे याच्या अनधिकृत बांधकामांच्या विषयावर नगरसेविका वंदना गीध यांना बोलू दिले नव्हते.  
नगरसेवक आणि पत्रकार वाटेकरी?
केवळ आयुक्तांचाच नव्हे तर नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि काही पत्रकारांचा ‘आश्रय’दाता म्हणूनही पालिकेत बोराडे याचा दबदबा होता. अटक झाल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने काही नगरसेवक आणि पत्रकारांना पैसे द्यावे लागत असल्याचे कबूल केले आहे, मात्र अद्याप त्यांची नावे उघड झालेली नाहीत.
लाचखोर १८ अधिकारी
नवनीत पाटील, मधुकर शिंदे, महम्मद अन्वर, प्रशांत नेर, नारायण परमार, सुहास गुप्ते, तुकाराम संख्ये, वसंत सांगळे, वसंत खाडे, भालचंद्र नेमाडे, सुरेश पवार, राजधर केदार, प्रताप मोरे, जयवंत म्हात्रे, अजित सिंग, डी. जी. काटकर, सुनील जोशी, गणेश बोराडे.
(छायाचित्र: फेरिवाल्यांनी सहाय्यक आयुक्त गणेश बोराडे याला अटक केल्यानंतर असा जल्लोष केला.)