या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ठाणे ते दिवा पाचव्या व सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी रविवार, १९ डिसेंबरला १८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामासाठी लोकलबरोबरच मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार असून मुंबई ते पुणे, नाशिकसह अन्य मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी ८ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत ब्लॉकदरम्यान काम चालेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

रविवारी सकाळी पावणेआठ ते रात्री ११.५२ पर्यंत कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या आणि अर्ध जलद लोकल दिवा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येतील. त्यामुळे मुंब्रा आणि कळवा स्थानकात लोकलला थांबा नसेल. या लोकल मुलुंडनंतर पुन्हा धीम्या मार्गावर धावतील. या मार्गावरील लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील. सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या आणि अर्ध जलद लोकल सकाळी पावणेआठ ते मध्यरात्री सव्वाएक वाजेपर्यंत मुलुंड ते दिवा स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. यादरम्यानही कळवा आणि मुंब्रा स्थानकात लोकल गाड्यांना थांबा मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.

मुंबई ते पुणे, नाशिकसह अन्य मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

शनिवार, १८ डिसेंबरला रद्द केलेल्या मेल,एक्स्प्रेस

अमरावती ते मुंबई एक्स्प्रेस, नांदेड ते मुंबई एक्स्प्रेस, कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्स्प्रेस

रविवारी रद्द केलेल्या एक्स्प्रेस

मुंबई ते पुणे ते मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई ते मनमाड ते मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई ते जालना ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई ते अदिलाबाद नंदिग्राम एक्स्प्रेस, मुंबई ते पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई ते अमरावती एक्स्प्रेस, मुंबई ते गडग एक्स्प्रेस, मुंबई ते नांदेड एक्स्प्रेस, मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस.

सोमवारी रद्द केलेल्या एक्स्प्रेस

गाडी क्र मांक ११४०२ अदिलाबाद ते मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेस, गाडी क्र मांक १११४० गडग ते मुंबई एक्स्प्रेस शनिवारी गाडी क्रमांक १७३१७ हुबळी ते दादर एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच चालवण्यात येणार आहे. तर गाडी क्र मांक १७३१८ दादर ते हुबळी एक्स्प्रेस पुण्यातून सुटेल.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी

ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांच्यासह मुंबई रेल्वे विकास महामंडळाचेही अधिकारी उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 hour railway local train megablock on sunday akp
First published on: 18-12-2021 at 01:30 IST