रस्तोरस्ती कोंडमारा

लिंक रोड

सुहास जोशी

भरपूर सिग्नल, छोटय़ा वाहनांची वाढती संख्या, काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारे फेरीवाले, मोठमोठय़ा मॉलमुळे वाढणारी वाहनांची गर्दी आणि काही ठिकाणी अजूनही सुरू असलेले मेट्रोचे काम अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या लिंक रोडवरील वाहतुकीचा सध्या पुरता बोजवाराच उडालेला असतो. पश्चिम उपनगरात अंतर्गत वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या लिंक रोडवर दोन-तीन दहिसर गाठायचे असेल तर दोन तास वीस मिनिटांची रखडपट्टी सोसावी लागते.

लिंकरोडवर डी. एन. नगर ते दहिसर या टप्प्यात मेट्रो २ ए ही मार्गिका आहे. या मार्गिकेचे ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक काम झाले आहे. मेट्रो स्थानकांची निम्मी कामे अजूनही बाकी आहेत. याखेरीज या मार्गावर अनेक ठिकाणी रस्तारोधक उभारण्यात आल्याने येथे वाहतूक कोंडी होते. डी. एन. नगर, जोगेश्वरी स्थानकाकडे जाणारा रस्ता, मेगा मॉल, ओशिवरा बस आगारानंतर, इन्फिनिटी मॉलनंतर, लालजी पाडा कांदिवली या ठिकाणी अजूनही रस्तारोधक असून तेथे वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात होत असते. लालजी पाडा येथे तर केवळ एकच वाहन जाऊ शकेल इतकाच रस्ता शिल्लक आहे. मुळात या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस अतिशय वाईट अवस्था आहे. रस्त्यावरच अनेक फेरीवाले बसलेले असतात. या रस्त्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे. काहीशी अशीच अवस्था ओशिवरा बस आगाराच्या अलीकडे नाल्यावरील पुलापाशी दिसते.

लिंक रोड हा अंतर्गत वाहतुकीसाठी मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. अनेक ठिकाणी रेल्वे स्थानकाकडे जाणारे रस्ते, महत्त्वाच्या वसाहतींकडे जाणारे रस्ते लिंक रोडला छेदले जातात. या ठिकाणी असणाऱ्या सिग्नलमुळे वाहतुकीचा वेग अतिशय संथ आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे मॉल आहेत. या मॉलकडे येणाऱ्या वाहनांची वर्दळ जास्त असते. विशेषत: सुट्टीच्या दिवशी याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होते.

या रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक वाहनांचा प्रवास या रस्त्यांवरून होत असतो आणि त्यात दिवसेंदिवस आणखीन वाहनांची भर पडत असते. काही ठिकाणी अगदी छोटय़ा प्रमाणात जरी रस्तारोधक असतील तर त्यामुळे वाहतूक कोंडी वाढतच जाते. रस्त्याची क्षमता आणि त्यावरील वाहनांची संख्या याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

-संदीप भाजीभाकरे, वाहतूक पोलीस उपायुक्त.