सहा हजारांहून अधिक जणांना करोनाची बाधा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोनाबाधितांच्या सेवेसाठी सुरुवातीपासून तत्पर असलेल्या मुंबई महापालिकेतील सुमारे १९७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, तर पालिकेतील सुमारे सहा हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची  बाधा झाली आहे. त्यात डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयीन कर्मचारी यांची संख्या सुमारे सव्वादोन हजाराच्या आसपास आहे.

मुंबईमध्ये मार्चमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली. दरम्यानच्या काळात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आणि सर्व कारभार ठप्प झाला. उपनगरीय रेल्वे सेवा बंद झाली. रस्तेही ओस पडले. मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली होती. बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू ठेवली होती. बेस्ट बस वा खासगी वाहनांनी कर्मचारी कार्यालय गाठत होती. करोनाबाधित रुग्णांना विलगीकरणात ठेऊन संसर्गावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी करोना काळजी केंद्र, करोना समर्पित आरोग्य केंद्रे, जम्बो करोना केंद्रांची उभारणी केली. त्याचबरोबर नायर रुग्णालय करोना रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर बेघर, बेरोजगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून पालिका अधिकारी, कर्मचारी त्यांना दोन वेळचे जेवण पोहोचविण्याचे कामही करीत होते. त्याचबरोबर विलगीकरण, टाळेबंद इमारत आणि प्रतिबंधित क्षेत्रांतील रहिवाशांना सुरुवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात येत होते. एकूण परिस्थितीत पालिका अधिकारी, कर्मचारी विविध कामांमध्ये व्यग्र होते.

करोनाविषयक कामांमध्ये व्यग्र असलेल्या सुमारे सहा हजार ७९ पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील दोन हजार ३६४ डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. एकूण बाधितांपैकी पाच हजार ४७ जण करोनामुक्त झाले आहेत. तर सुमारे १९७ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. सुमारे १५ जणांचा मृत्यूबाबतचा अहवाल अद्याप पालिकेला प्राप्त झालेला नाही.

सफाई कामगारांचे प्रमाण अधिक

करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे ४५ सफाई कामगारांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन खातेप्रमुख, करनिर्धारण आणि संकलन विभागातील दोन, आरोग्य खात्यातील ३७, अग्निशमन दलातील १० जण सुरक्षा रक्षक खात्यातील १३ जण, ‘परिमंडळ-१’मधील पाच, ‘परिमंडळ-२’मधील चारजण, इतर विभाग व खात्यांतील ७० जणांचा समावेश आहे. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन विभागातील नऊ कंत्राटी कामगार / आरोग्यसेविकांचाही मृतांमध्ये समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 197 bmc officers and employees dead due to coronavirus zws
First published on: 19-02-2021 at 00:23 IST