मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत मुंबई स्वच्छ करण्याचा विडा महानगरपालिकेने उचलला आहे. या अंतर्गत २० हजार शौचालये बांधण्यात येणार आहेत. तसेच केवळ महिलांसाठी २०० प्रसाधनगृहे बांधण्यात येणार आहेत. या शौचालयांसाठी जागा आणि त्यांची संख्या निश्चित करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभाग कार्यालयांना दिले आहेत. गेल्या आठवड्यात मुंबई सुशोभिकरण प्रकल्पातील काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी या प्रकल्पांतर्गत मुंबईत २० हजार शौचालये बांधण्याचा, तसेच ते २४ तास स्वच्छ ठेवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>मुंबई: गेट वे ऑफ इंडिया – बेलापूर वॉटर टॅक्सीची प्रतीक्षा संपुष्टात

तसेच या कार्यक्रमांतर्गत झोपडपट्ट्यांमध्येही शौचालये, सामुदायिक कपडे धुण्याची यंत्रणा (कम्युनिटी वॉशिंग मशिन) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली होती. या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी आता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. मुंबईत किती ठिकाणी, किती शौचालये आहेत त्याची माहिती व सांख्यिकी गोळा करण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. संपूर्ण मुंबईतील सार्वजनिक प्रसाधनगृहांची नियमित देखभाल, स्वच्छता राखण्यासाठी धोरण तयार करण्यात येत असून त्यासाठी या माहितीचा वापर करण्यात येत आहे. सर्व सार्वजनिक प्रसाधनगृहे २४ x ७ तत्त्वावर चांगल्या पद्धतीने स्वच्छ राखली गेली पाहिजेत, यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यक त्या वसाहतींमध्ये नवीन प्रसाधनगृहे बांधावी, केवळ महिलांसाठी राखीव असलेली व त्यानुरुप सर्व सुविधा समाविष्ट असलेली किमान २०० प्रसाधनगृहे मुंबईत बांधावी, सर्व विभाग कार्यालयांनी आपल्या स्तरावर प्रसाधनगृहांची आवश्यक संख्या निश्चित करावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 200 toilets for women will be constructed under the mumbai beautification project mumbai print news amy
First published on: 19-12-2022 at 11:37 IST