मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि विलेपार्ले बॉम्बस्फोट प्रकरण
डिसेंबर २००२ ते मार्च २००३ या दरम्यान मुंबई सेंट्रल स्थानकावरील मॅक्डोनाल्डमध्ये, विलेपार्ले येथील बाजारपेठेत आणि मुलुंड स्थानकात उपनगरी गाडीत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या मुजम्मिल अन्सारी याच्यासह तिघांना ‘पोटा’ न्यायालयाचे न्या. पी. आर. देशमुख यांनी बुधवारी जन्मठेप सुनावली. मुजम्मिल यानेच या तिन्ही ठिकाणी बॉम्ब ठेवले होते त्यामुळे त्याला आजन्म जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. ‘सिमी’ या बंदी घातलेल्या संघटनेचा माजी सचिव साकीब नाचन याला न्यायालयाने दहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. ‘पोटा’अंतर्गत दाखल असलेला हा शेवटचा खटला होता. फरहान खोत आणि डॉ. वाहिद अन्सारी या दोघांचा जन्मठेप झालेल्या दोषींमध्ये समावेश आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना दोन वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. या खटल्यात एकूण दहा आरोपी होते.
अन्सारीविरोधातील आरोप हे ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ प्रकारात मोडत नाहीत. तसेच फासावर लटकवताच काही क्षणांत जीवन संपत असल्याने त्याच्या दुष्कृत्यापायी कित्येक निरपराधांना कोणत्या मानसिक व भावनिक यातना भोगाव्या लागत आहेत, याची जाणीव दोषीला होत नाही. त्यामुळे आजन्म जन्मठेप या प्रकरणात योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने सगळ्या आरोपींना मिळून ९.४५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यातील ७५ टक्के जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला, तर उर्वरित रक्कम रेल्वेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही दिले आहेत.
या बॉम्बस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांबाबत तसेच जखमींबाबत पुरेसा पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात अडचण असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सुटकाही लगेच..
महम्मद कामील जमील शेख, नूर महम्मद, अन्वर अली या तिघांना अवैध हत्यारे बाळगल्याप्रकरणी दोन वर्षांचा कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. या तिघांनीही आठ वर्षे तुरुंगात काढली आहेत शिवाय साकीब नाचन यानेही बराच काळ तुरुंगात काढल्याने या सर्वाची सुटका होणार आहे.
जन्मठेप..
* मुजम्मिल अन्सारी (४२)
आरोप : तिन्ही स्फोटांच्या कटाचा सूत्रधार. तिन्ही बॉम्ब ठेवले. ६ डिसेंबर २००२ रोजी फरारी जनाब इलियास याच्यासोबत मुंबई सेंट्रल स्थानकातील मॅक्डोनाल्डमध्ये बॉम्ब ठेवला. सायंकाळी ४.५० वाजता झालेल्या या स्फोटात २५ जण जखमी. २७ जानेवारी २००३ रोजी त्याने जनाबसोबत विलेपार्ले स्थानकाबाहेर बॉम्ब ठेवलेली सायकल उभी केली. रात्री ८.१० वाजता स्फोटात एकाचा मृत्यू. १३ मार्च २००३ रोजी त्याने सायंकाळी ७.५६ वाजता सीएसटी-कर्जत लोकलच्या महिलांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात बॉम्ब ठेवला. रात्री ८.३६ वाजता ही गाडी मुलुंड स्थानकात पोहोचत असताना स्फोट. ११ प्रवाशांचा मृत्यू.
शिक्षा : आजन्म जन्मठेप आणि एक लाख रुपये दंड.
* फरहान खोत (४०)
आरोप : हल्ल्याचा कट रचणे, युद्ध पुकारणे. जिवंत बॉम्ब बाळगणे. बॉम्बसाठीचे रसायन बाळगणे.
शिक्षा : जन्मठेप.
* डॉ. वाहिद अन्सारी (४७)
आरोप : दवाखान्यात हल्ल्यासाठीचे बॉम्ब ठेवले.
शिक्षा : जन्मठेप आणि एक लाख रुपये दंड.
दहा वर्षे तुरुंगवास, १ लाखांचा दंड..
* साकीब नाचन
आरोप : दहशतवादी कारवायांत सामील. फेब्रुवारी ते एप्रिल २००३ या काळात एके-५६ रायफल, दोन मॅगझिन्स तसेच २७ जिवंत काडतुसे सापडली. जिवंत काडतुसांनी भरलेले एक पिस्तुलही सापडले.
शिक्षा : १० वर्षांचा तुरुंगवास व एक लाख रुपये दंड.
* गुलाम कोटल (४५), आतिफ मुल्ला (४०), नसीर मुल्ला (४९)
यांच्यावरही बॉम्बस्फोटांचा कट रचणे आणि युद्ध करणे, शस्त्रे बाळगणे, हल्ल्यासाठी तरुणांना कटात सहभागी करून घेणे व त्यांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देणे, आदी आरोप सिद्ध.