2008 Malegaon Bomb Blast Case Accused Acquitted : देशातील दहशतवादाशी संबंधित दीर्घकाळ चाललेल्या खटल्यांपैकी एक असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने आज दिला असून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. मात्र हा निकाल ऐकून दुःख झाले आणि या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे मालेगावमधील प्रत्यक्षदर्शी व पीडितांचे नातेवाईक डॉ. अन्सारी अखलाक अहमद यांनी न्यायालयाबाहेर आल्यानंतर सांगितले.
दरम्यान, मालेगाव येथील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. तेव्हा मी एक किलोमीटरच्या अंतरावर होतो आणि या बॉम्बस्फोटासंदर्भात कळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या बॉम्बस्फोटात लहान मुलांसह सर्वसामान्य नागरिक होरपळले होते. मात्र बॉम्बस्फोट झालाच नाही, असे या प्रकरणातील एक आरोपी म्हणत आहे. रमझान महिन्याच्या काळात बॉम्बस्फोट केला गेला. हा थरार मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे. या बॉम्बस्फोटात माझे अनेक नातेवाईक जखमी झाले होते. आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे. हा आमच्यावर अन्याय झाला आहे, हा निकाल ऐकून तीव्र दुःख झाले असून या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत.
दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यासंबंधित सुनावणीला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. तब्बल १७ वर्षांनंतर लागणाऱ्या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सत्र न्यायालयाबाहेर सुरक्षा व्यवसथा वाढविण्यात आली होती. मोठ्या संख्येने पोलिसांबरोबर सुरक्षा यंत्रणांचे जवान तैनात आहेत. प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केल्यानंतरच न्यायालयात प्रवेश दिला जात होता. या सुरक्षेसंदर्भातील प्रक्रियेमुळे मुंबई सत्र न्यायालयात इतर खटल्यासंबंधित कामासाठी आलेल्या नागरिकांना व वकिलांना एका रांगेत न्यायालयात सोडले जात होते. त्यामुळे न्यायालयाबाहेर सर्वसामान्य नागरिक व वकिलांच्या रांगा पाहायला मिळाल्या.