मुंबई : मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात वैद्यकीय कारणास्तव सतत अनुपस्थित राहणाऱ्या भोपाळच्या भाजप खासदार आणि खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची प्रकृती खरेच बिघडली आहे का, असा प्रश्न विशेष न्यायालयाने बुधवारी उपस्थित केला. तसेच, साध्वी यांच्या आरोग्याची शहानिशा करण्याचे आणि त्याचा अहवाल ८ एप्रिल रोजी सादर करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले.

विशेष म्हणजे, वैद्यकीय कारणास्तव सतत सुनावणीला अनुपस्थित राहणाऱ्या साध्वी यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल मागवण्यात यावा, अशी मागणी एनआयएने केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन तसेच मागणी योग्य वाटत असल्याचे नमूद करून न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले. खटल्याच्या सुनावणीला प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव साध्वी सतत अनुपस्थित राहतात. त्यांच्या या अनुपस्थितीमुळे खटल्याच्या कामकाजावर परिणाम होत असून खटल्याला विलंब होत आहे, अशी टिप्पणीही विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी यांच्या आरोग्याची शहानिशा करण्याचे आदेश देताना केली.

हेही वाचा – दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांत धुसफूस, शिवसेनेकडून प्रचार फेऱ्यांना सुरुवात

साध्वी या बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पुन्हा एकदा वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित राहिल्या. त्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. वास्तविक, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१३ अंतर्गत आरोपी म्हणून साध्वी यांचे आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांबाबत म्हणणे नोंदवून घेणे आणि त्यासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक आहे. परंतु, त्यांची सततची अनुपस्थिती खटल्यात अडथळा निर्मांण करत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

हेही वाचा – कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य

दरम्यान, सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिल्याबद्दल साध्वी यांना विशेष न्यायालयाने ११ मार्च रोजी जामीनपात्र वॉरंट बजावले होते. मात्र, त्यानंतर ठाकूर यांनी विशेष न्यायालयात उपस्थित राहून जामीनपात्र वॉरंट रद्द केले होते.