मुंबई: मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरूवारी निकाल दिला. हा निकाल देताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी  साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली.

या खटल्यातील कुणावर काय आरोप होते ते जाणून घ्या

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर – बॉम्बस्फोटांच्या कटात सहभाग. कटाच्या बहुतांश बैठकांना उपस्थित. बॉम्ब ठेवण्यासाठी स्वतःची दुचाकी सहआरोपींना उपलब्ध केली.

निवृत्त मेजर उपाध्याय – कटात सहभाग. आरोपींना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप.

निवृत्त ले. कर्नल पुरोहित – बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा राज्याचा दहशतवादविरोधी पथक (एटीएस), राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) निष्कर्ष. बॉम्बसाठी आवश्यक आरडीएक्स काश्मीरमधून महाराष्ट्रात वाहून आणले. लष्करात असताना अभिनव भारत या हिंदुत्ववादी, हिंसेचे समर्थन करणाऱ्या संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या हिंसक कारवायांसाठी आवश्यक शस्त्र सामग्री विकत घेण्याकरिता मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला. त्याचा वापर मालेगाव बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठीसाठी केला.

 समीर कुलकर्णी – बॉम्ब तयार करण्यापासून, तो ठेवण्यापर्यंत आवश्यक असलेली सर्व साधन सामग्री उपलब्ध करणे.

अजय राहिरकर – अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेचा कोषाध्यक्ष, गुन्ह्यासाठी आर्थिक तजवीज आणि कटात प्रत्यक्ष सहभाग.

सुधाकर द्विवेदी – द्विवेदी याची दयानंद पांडे ऊर्फ स्वामी अमृतानंद देवतीर्थ या उपनावांनीही ओळख. जम्मू काश्मीरचा रहिवासी आणि स्वयंघोषित शंकराचार्य. बॉम्बस्फोट कटाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा एनआयएचा दावा.

सुधाकर चतुर्वेदी – बॉम्बस्फोटाच्या नियोजनात सहभाग, अटक झाली तेव्हा शस्त्रसाठा जप्त.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अद्याप दोन आरोपी फरारीच

– रामजी कलसंग्रा आणि संदीप डांगे या दोन आरोपींचा अद्याप शोध सुरू असून बॉम्बस्फोट घडल्यापासून त्यांचा ठावठिकाणा देशभरातील तपास यंत्रणा लावू शकलेल्या नाहीत. या.दोघांनी बॉम्ब पेरल्याचा दावा तपासयंत्रणांनी केला आहे. दरम्यान, एटीएसच्या तपास पथकात सहभागी असलेले निलंबित पोलिस अधिकारी. मेहबूब मुजावर यांनी या दोघांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा २०१६ मध्ये केला होता.

खटल्याआधी हे आरोपी दोषमुक्त

शिवनारायण कलसंग्रा, श्यामलाल साहू आणि प्रवीण मुतालिक यांना एनआयएच्या विनंतीवरून विशेष एनआयए न्यायालयाने दोषमुक्त केले होते.