2008 Malegaon Bomb Blast Case Accused Acquitted : मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरूवारी निकाल दिला. हा निकाल देताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली.

एनआयएचा दावा

मालेगाव हे मोठ्या प्रमाणात मुस्लिमबहुल शहर आहे. मुस्लिम समुदायामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी, दोन धर्मात तणाव निर्माण करण्यासाठी आणि राज्यातंर्गत सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी कट रचण्याच्या उद्देशाने स्फोट घडविण्यात आल्याचा युक्तिवाद एनआयएकडून कऱण्यात आला होता. नवरात्रोत्सवाच्या आधी, रमजानच्या पवित्र महिन्यात हा स्फोट घ़डवून मुस्लिम समुदायामध्ये दहशत निर्माण करण्याचा आरोपींचा हेतू असल्याचा दावाही एनआयएने केला होता. तसेच स्वीकारार्ह, ठोस पुराव्यांच्या आधारे घटनांची संपूर्ण साखळी आम्ही मांडली. त्यामुळए, याच आरोपींनी एकत्रितपणे या बॉम्बस्फोटाचा कट रचून त्याची अंमलबजावणी केल्याचा दावाही एनआयएने केला होता.

आरोपींचा युक्तिवाद

या प्रकरणात आपला कोणताही सहभाग नाही, पूर्णपणे बेकायदेशीररीत्या, कायद्याविरुद्ध आणि वाईट हेतूने आपल्याला या कटात गोवण्यात आल्याचा दावा प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला होता. तसेच एटीएस अधिकारी मोहन कुलकर्णी यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले होते. पूर्वग्रहदुषित मताने या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावाही साध्वी यांनी केला होता. तर कथित गुन्ह्याशी आपला संबंध जोडणारा कोणताही ठोस पुरावा नाही. सरकारी पक्षाचा खटला बनावट आणि परस्परविरोधी साक्षीदारांच्या जबाबांवर आधारित असल्याचा दावा पुरोहित याने केला होता. तपासात अनेक गंभीर आणि प्रक्रियात्मक त्रुटी असल्याचा दावाही केला. तर काही आरोपींनी बॉम्बस्फोट कधीच झाला नव्हता, तर काहीजणांनी स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा स्फोटामागे हात असल्याचा दावा केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.