२६/११ हल्ला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लष्कर-ए-तैय्यबाचा अतिरेकी आणि मुंबईवरील हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक सूत्रधार सय्यद झैबुद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याच्यावर विशेष न्यायालयाने बुधवारी २६/११च्या हल्ल्याप्रकरणी एकूण २३ आरोप निश्चित केले. त्यानंतर आपण निर्दोष असल्याचा दावा जुंदालने केल्याने त्याच्यावर आता खटला चालविण्यात येणार आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांच्यासमोर जुंदालला बुधवारी हजर करण्यात आले. जुंदालवर ठेवण्यात येणाऱ्या आरोपांचा मसुदा पोलिसांनी डिसेंबर २०१३ मध्ये न्यायालयासमोर सादर केला होता. त्यापैकी २३ आरोप जुंदालवर न्यायालयाने निश्चित केले असून त्यानुसार त्याच्यावर खटला चालविण्यात येणार आहे.
या आरोपांमध्ये हल्ल्याचा फौजदारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना सहकार्य करणे आदी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत जुंदालवर आरोप ठेवण्यात आले. याशिवाय बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा, स्फोटके प्रतिबंधक कायदा, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, रेल्वे कायदा आणि सीमा शुल्क कायद्याअंतर्गतही त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
मूळचा बीड येथील रहिवासी असलेल्या जुंदालला सौदी अरेबियाने हद्दपार केल्यानंतर २०१२ रोजी त्याला भारतात आणण्यात आले. २६/११च्या हल्ल्यासोबतच पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, नाशिक येथील पोलीस अकदामीवरील हल्ला आणि औरंगाबाद शस्त्रसाठा तस्करीप्रकरणीही जुंदाल आरोपी आहे. दरम्यान, या प्रकरणी अमेरिकन-पाकिस्तानी दहशतवादी डेव्हिड हेडली यालाही आरोपी करण्याच्या पोलिसांच्या मागणी अर्जावर न्यायालय युक्तिवाद ऐकणार आहे. जुंदाल याच्यासह हेडलीवर खटला चालविण्याची मागणी पोलिसांनी एका अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली होती. तसेच त्यासाठी त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची मागणी अमेरिकन न्यायालयाकडे करू देण्यासाठी परवानगी मागितली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 23 terror charges on abu jundal
First published on: 05-11-2015 at 05:08 IST