वर्षभरात महाराष्ट्रात २३५ आत्मचरित्रे ‘प्रसिद्ध’
गेल्या काही वर्षांपासून मराठीत ‘आत्मचरित्र’ हा वाङ्मय प्रकार अतिशय लोकप्रिय ठरत आहे. यापूर्वी अनेक उत्तम मराठी आत्मचरित्रांनी मराठीचे वैभव वाढवले आहे. परंतु आता गुणवत्तेला संख्येची जोड मिळाली आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील विविध प्रकाशकांनी मराठीत २३५ आत्मचरित्रे प्रकाशित केली आहेत. यात लेखक, कलावंत, राजकारणी, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते आदींची आत्मचरित्रे विशेष लोकप्रिय ठरत आहेत.
प्रत्येक माणसाचे अनुभव विश्व वेगळे असते. त्या अनुभवांचे विश्लेषण, जगतानाचा संघर्ष आणि स्वत:ची उलट तपासणी असा संपूर्ण ऐवज वाचकासमोर उघड करणाऱ्या साहित्यकृतीतील आत्मचरित्र या प्रकाराचा झपाटा वाढत आहे. वर्षभरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आत्मचरित्रे लिहिली गेली. यात जगताना समाजात मोठे योगदान देणाऱ्या आणि सर्वसामान्यांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींची आत्मचरित्रे वाचकांचे विशेष लक्ष वेधत आहेत. मात्र दुसरीकडे आयुष्यातील अनेक गोष्टी समाजातील मोठय़ा व्यक्तींशी जोडल्या आहेत. त्यामुळे आपले आयुष्य तातडीने लोकापर्यंत पोहोचावे. या हेतून अनेक आत्मचरित्रे लिहिले जात आहेत. त्याचप्रमाणे जगण्यावर कर्तृत्वाचा ठसा उमटण्याआधीच आपले जगणे जगासमोर मांडण्याची स्पर्धा सुरू झाल्याने आत्मचरित्र लिहिण्याचे प्रमाण वाढत असल्याचे जाणकार सांगतात.
लोकप्रियतेचीही आस
काही दशकांपूर्वी आत्मचरित्रे हा साहित्यप्रकार इतक्या झपाटय़ाने लिहिला जात नव्हता. मात्र सध्या खासगी आयुष्यात डोकावण्याची प्रवृत्ती वाढली आहे. याशिवाय एखादा प्रसंग सांगून आपण लोकप्रिय ठरावे या दृष्टिकोनातून आत्मचरित्र लिहिले जात असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. मात्र या जोडीला अनेक उत्कृष्ट आत्मचरित्रेही मराठीत येत आहेत. मात्र त्याची संख्या कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. वाचकांना अनेक आत्मचरित्रे वाचण्यासाठी उपलब्ध असली तरी त्यातील उत्तम आत्मचरित्रे निवडण्याकडे वाचकांचा कल असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या समाजाला प्रेरणादायी ठरणारी आत्मचरित्रे वाचकांच्या पसंतीस उतरत आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत २०१५ साली आत्मचरित्र लिखाणाचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. सध्या डॉ. प्रकाश आमटे यांचे ‘प्रकाशवाटा’ तर विजया मेहता यांचे ‘झिम्मा’ या आत्मचरित्राला प्रचंड मागणी आहे. त्याचप्रमाणे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे अग्निपंख हे आत्मचरित्रही विशेष आवडीने वाचले जात आहे.
– मंदार जोगळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुकगंगा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 235 biographies book published in maharashtra at this year
First published on: 17-01-2016 at 03:12 IST