मुंबई : सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागासह (सीआयडी) न्यायालयीन चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी सीआयडीच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

धक्कादायक म्हणजे कोठडीत सुरक्षेसाठी चार सुरक्षा रक्षक तैनात होते. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने सागर पाल (२१), विकीकुमार गुप्ता (२४), सोनूकुमार बिश्नोई (३५) आणि अनुज थापन यांना बेड्या ठोकल्या होत्या. पोलीस कोठडीतील आरोपी गुप्ता, पाल आणि थापन यांना गुन्हे शाखेने मुंबई पोलीस आयुक्तालयातील कोठडीत ठेवले होते. मुंबई पोलीस आयुक्तालयातील ज्या कोठडीत अनुज थापन याला ठेवण्यात आले होते. तेथे आर्थिक गुन्हे शाखेचे आणि गुन्हे शाखेचे आरोपी एकत्र ठेवण्यात आले होते. सुरक्षा आणि देखरेखीसाठी चार पोलिसांना तैनात करण्यात आले होते.

हेही वाचा – मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात सराफाची तक्रार, पाच कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल

थापन याने बुधवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान कोठडीतील शौचालयात सतरंजीची फाडलेली पट्टी आणि खिडकी यांच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. थापन याच्या कोठडीतील मृत्यूची नोंद आझाद मैदान पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सीआयडीकडून सीसीटीव्ही चित्रिकरण ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच कोठडीतील सर्व आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे. सीआरपीसी कायद्याच्या कलम १७४ अन्वये सीआयडी तपास करत आहे. याशिवाय सीआरपीसी कायद्याच्या कलम १७६ अन्वये न्यायालयीन चौकशी करण्यात येत आहे. सर जे. जे. रुग्णालयात गुरुवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. याचे नमुने पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सीआयडीने कोठडीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. सीआयडीकडून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल, तपासासाठी १० ते १२ पथके

अनुज थापन हा पोलीस अभिलेखावरील आरोपी होता. मुंबई पोलिसांनी अटक करण्याच्या आधी पंजाबमधील स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी करत गुन्ह्याशी संबंधित आवश्यक माहिती घेण्यात आली होती. तसेच, त्याच्याकडे आणखी चौकशी बाकी होती. तो तपासात ठीकठाक सहकार्य करत होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.