अशोक अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : राज्यात मुस्लीम धर्मीयांची ११.५४ टक्के लोकसंख्या असली तरी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही मुख्य आघाडयांनी एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिलेली नाही. महाविकास आघाडीचे मुस्लीम मतांवर लक्ष असले तरी आघाडीनेही एकही उमेदवार या समाजाचा उभा केलेला नाही.  वंचित बहुजन आघाडी, बसप आणि एमआयएम या पक्षांनी १० मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांत ८१ मुस्लीम उमेदवार निवडणुकीस उभे आहेत.

राज्यातून आजपर्यंत सर्वपक्षीय ५६७ खासदार संसदेत पोहोचले आहेत. त्यातील १६ मुस्लीम होते. त्यामध्ये १५ काँग्रेसचे असून २०१९ मध्ये एमआयएमचे औरंगाबादमधून इम्तियाज जलील निवडून आले आहेत. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी धुळे, नांदेड, औरंगाबाद, परभणी, लातूर, भिवंडी, अकोला, ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघ अशा १४ मतदारसंघांत मुस्लीम मतदारांचे प्रमाण १५ ते २५ टक्केच्या दरम्यान आहे. यंदा बीड लोकसभा मतदारसंघातून १९ मुस्लीम उमेदवार उभे आहेत. यासंदर्भात काँग्रेस अल्पसंख्याक विकास आघाडींचे प्रमुख आमदार वजाहत मिर्झा म्हणाले, काँग्रेसने मला विधान परिषद दिली, इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून राज्यसभा दिली. इतर पक्षांचे काय, त्यांचे मुस्लीम मतदार नाहीत काय, असा सवाल मिर्झा यांनी केला.

हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदे यांच्या मालमत्तेत १३ कोटींनी वाढ

बसप, वंचितचे चार उमेदवार

मुस्लीम उमेदवारांमध्ये बसपचे ४, वंचितचे ४ आणि एमआयएमच्या दोघांचा समावेश आहे. उर्वरित ७१ उमेदवार नोंदणीकृत पक्षाचे किंवा अपक्ष आहेत. शिवसेना-भाजपने आजपर्यंत राज्यात मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. महाविकास आघाडीतील या दोन्ही पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या पक्षांनी या वेळी राज्यात एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. पक्षाने मुस्लीम उमेदवार न दिल्याने काँग्रेस नेते नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे.

भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाला घाबरून विरोधी आघाडीतील पक्ष मुस्लीम उमेदवार देत नाहीत. आमचा पक्ष अशी भीती बाळगत नाही.– रईस शेख, समाजवादी पक्षाचे आमदार