आतापर्यंत ७९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबई : ऑक्टोबर महिन्यात १८ एसटी कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, महामंडळातील एकूण करोनाबळींची संख्या ७९ इतकी झाली आहे. महिन्याभरात ६९३ बाधितांची भर पडल्यामुळे एकूण रुग्णसंख्या २,४८६ वर पोहोचली आहे.

ऐन प्रादुर्भावाच्या काळात एसटीने श्रमिकांसाठी विशेष सेवा दिली. त्याचप्रमाणे मुंबई महानगरात अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीही सेवा सुरू होती. त्यावेळी कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. टाळेबंदी शिथिल होताच एसटीची सेवा पूर्ववत झाली आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ झाली. उपस्थिती १०० टक्के करण्यात आल्यापासून करोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संख्येतही काहीशी वाढ होऊ लागली आहे.

जून महिन्यात २४ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. त्यात हळूहळू वाढ होऊन ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला बाधितांची संख्या १,७९३ वर पोहोचली. त्याचप्रमाणे ६१ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची नोंद झाली.

आकडेवारी अशी..

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ४८६ इतकी झाली असून, ७९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ५५३ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून १,८५४ कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत. ठाणे विभागात सर्वाधिक २०३ कर्मचारी करोनाबाधित झाले असून ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ नाशिक विभागात १८८ कर्मचारी करोनाबाधित आणि ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. जळगाव व सांगली विभागात प्रत्येकी ७ कर्मचाऱ्यांचा, कोल्हापूर विभागात ६ आणि पुणे विभागात ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.