प्रसाद रावकर

मुंबई महापालिकेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या २७ ‘नर्सिग होम’ना करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी परवानगी दिली. याबाबतचे आदेश आयक्तांनी सोमवारी जारी केले. त्यामुळे आता करोनाबाधितांना घराजवळच्या नर्सिग होममध्ये उपचार घेणे शक्य होणार आहे.

मुंबईत करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर सरकारी आणि पालिकेच्या आरोग्य सेवेवर ताण आला होता. त्यामुळे नर्सिग होम आणि खासगी दवाखाने सुरू करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नर्सिग होम आणि खासगी दवाखाने सुरू करण्यात आले. मात्र काही नर्सिग होममध्ये करोनाबाधित रुग्णांकडून दामदुप्पट पैसे घेण्यात आल्याची प्रकरणे समोर आली होती. परिणामी, नर्सिग होम वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. त्यामुळे अखेर काही नर्सिग होममध्ये करोनाबाधितांवर उपचार करण्यास मनाई करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून काही नर्सिग होमनी पालिकेच्या निकषांनुसार करोनाबाधितांवर उपचार करण्याची तयारी दर्शविली होती. आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध असून नर्सिग होमना करोनाबाधितांवर उपचार करण्यास परवानगी देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर पालिकेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या २७ नर्सिग होमना करोनाबाधितांवर उपचार करण्यास आयुक्तांनी रविवारी परवानगी दिली. यापैकी बहुतांश नर्सिग होम पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये आहेत. त्यामुळे उपनगरांतील करोनाबाधितांना घराजवळ उपचार घेणे शक्य होणार आहे.

किमान २५ खाटांची क्षमता असलेल्या, अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वासोच्छवासाची यंत्रणा (व्हेंटिलेटर), एम. डी. डॉक्टरची उपलब्धता आदी अटींची पूर्तता केल्यामुळे २७ नर्सिग होमना पालिकेकडून अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

पालिका आयुक्तांच्या या निर्णयामुळे करोनाबाधितांवरील उपचारासाठी अतिरिक्त एक हजार ४३८ खाटा उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी अतिदक्षता विभागातील ३५१ खाटा, प्राणवायुची सुविधा असलेल्या ९६० खाटा आणि प्राणवायूची सुविधा नसलेल्या १२७ खाटांचा समावेश आहे.