मुंबई : राज्यात दिवसेंदिवसस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोनाचा नवा विषाणू वेगाने पसरत असल्याने राज्यातील रुग्णालयांनी आवश्यक सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने उपाययाेजना सुरू केल्या आहेत. त्याच धर्तीवर मुंबईतील कामा रुग्णालयाने करोनाबाधित रुग्णांसाठी ३० खाटांचे रुग्ण कक्ष उभारले आहे. या कक्षामध्ये जीवनरक्षक प्रणाली, प्राणवायू पुरवठा यंत्रणा, निगराणी प्रणाली आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कामा रुग्णालय हे महिला आणि बालकांसाठी समर्पित असलेले राज्यातील एकमेव रुग्णालय आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कामा रुग्णालयाने महिला आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या करोनाच्या लाटेच्या वेळी प्रशासनाने करोनाबाधित महिला व बालकांसाठी स्वतंत्र रुग्ण कक्षाची व्यवस्था केली होती. आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या या रुग्ण कक्षात एकूण ३० खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांसाठी २० खाटा, तर बालकांसाठी १० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नव्याने सुरू केलेल्या या रुग्ण कक्षात जीवनरक्षक प्रणाली, प्राणवायू पुरवठा यंत्रणा, निगराणी प्रणाली आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. या विभागात अनुभवी आणि प्रशिक्षित महिला डॉक्टर, परिचारिका, सहाय्यक कर्मचारी, रुग्ण सेवक तैनात करण्यात आले आहेत. यामुळे महिला व बालकांना अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि तातडीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.
करोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. या पार्श्वभूमीवर, महिला आणि बालकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मागील अनुभवानुसार करोना बाधित महिला व बालकांसाठी स्वतंत्र कक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढू लागताच महिला व बालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला. तसेच करोनाशी लढण्यासाठी सकारात्मक आणि नियोजनबद्ध उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या ठरत असल्याचे डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबईसह राज्यामध्ये वाढत असलेल्या करोना रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून उपचार घेण्याचे आवाहन कामा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.