गेल्या २४ तासांत आणखी ३० जणांना स्वाइन फ्लूचे निदान झाले असून रुग्णांची संख्या १४४ वर पोहोचली आहे. मात्र स्वाइन फ्लूमुळे प्रकृती अत्यवस्थ होण्याचे प्रमाण अत्यल्प असून मुंबईतील केवळ दोघेच सध्या कृत्रिम श्वसनयंत्रणेच्या आधारावर आहेत. बहुतांश रुग्णांना घरीच औषधोपचार घेऊन बरे वाटत आहे.
स्वाइन फ्लूच्या मृत्यूंमध्ये राजस्थान आणि गुजरातनंतर राज्याचा क्रमांक लागला आहे. रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत असून त्यात नागपूर, पुण्याच्या जोडीने मुंबईतही रुग्ण आहेत. बाहेरून उपचारांसाठी आलेल्या ५३ रुग्णांसह शहरातील स्वाइन फ्लूच्या १९८ रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात पश्चिम उपनगरे आणि दक्षिण भागांतच प्रामुख्याने स्वाइन फ्लूची साथ दिसत असून गेल्या २४ तासांतील २५ हून अधिक रुग्ण याच पट्टय़ातील आहेत.
 सध्या शहरातील दोघे, तर इतर भागांमधून आलेले चौघे रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर आहेत. इतरांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी तसेच पालिका रुग्णालयात तसेच औषधे देऊन घरीच उपचार करण्यात येत आहेत. सोमवारी स्वाइन फ्लूमुळे मुंबईतील पहिला रुग्ण दगावला. मात्र या रुग्णामध्ये आकडीचा पूर्वइतिहास होता. लहान मुले, वृद्ध तसेच मधुमेह- उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांमुळे प्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांना स्वाइन फ्लू होण्याची तसेच या संसर्गामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे.