मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सफाई कामगारांच्या आश्रय योजनेतील घरांसाठी ४ चटईक्षेत्र निर्देशांक देण्यास हिरवा कंदिल दाखविल्याने दारिद्रय़ात खितपत पडलेल्या पालिकेच्या कामगारांना ३०० चौरस फुटांचे सेवानिवासस्थान मिळणार आहे. आचारसंहिता जारी झाली असतानाही आश्रय योजनेस स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. मात्र निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यामुळे निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्याशिवाय पालिकेला या योजनेची अंमलबजावणी करता येणार नाही.
मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी झटणारे पालिकेचे सफाई कामगार मात्र मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन जगत होते. अत्यंत बकाल अवस्थेत राहणाऱ्या सफाई कामगारांना उत्तम दर्जाचे घर देण्यासाठी पालिकेने आश्रय योजना आखली. यात भायखळा आणि माहीम येथील सफाई कामगारांच्या मोडकळीस आलेल्या इमारती पाडून तेथे इमारती उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. येथील कामगारांच्या पर्यायी घरांसाठी संक्रमण शिबीर बांधण्याचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीपुढे सादर झाला होता. त्यास स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मंजुरी दिली. दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता स्थायी समितीमध्ये मंजूर झालेला हा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.