मुंबई : वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली फेरी शुक्रवारी संपली. या दोन्ही अभ्याक्रमांसाठी राज्यभरामध्ये १० हजार ८६४ विद्यार्थांना प्रवेशाची संधी मिळाली होती. यापैकी तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे पुढील फेरीसाठी ३ हजार ५५ इतक्या जागा उपलब्ध झाल्या आहेत.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमातील जवळपास सर्वच शासकीय आणि खासगी महाविद्यालयांतील जागांचे वाटप केले होते. या जागांवर विद्यार्थ्यांना शुक्रवार सायंकाळपर्यंत महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश घ्यायचा होता. राज्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ८ हजार १३९ जागांसाठी ८ हजार १०६ विद्यार्थांना प्रवेशाची संधी मिळाली होती. यातील ६ हजार ८४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर १ हजार २५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले. शासकीय महाविद्यालयांत ४ हजार ९२० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ४ हजार ८८७ जागा विद्यार्थ्यांना जाहीर झाल्या. यावर ४ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर ४६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले.

खासगी महाविद्यालयांत ३ हजार २१९ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यापैकी २ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला; परंतु ७८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्याचप्रमाणे दंत अभ्यासक्रमाच्या २ हजार ७२५ जागांसाठी २ हजार ७०९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यातील फक्त ९६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर १ हजार ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले. शासकीय महाविद्यालयांमध्ये ३२५ जागांपैकी ३११ जागांवर प्रवेश जाहीर झाले.

पण फक्त १७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. खासगी दंत महाविद्यालयांत २ हजार ३९८ जागांवर प्रवेश जाहीर झाले, पण त्यापैकी फक्त ७९० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. तर १ हजार ६१० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी हजेरी लावली नसल्याचे दिसून आले आहे. यावरून वैद्यकीय अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असला तरी दंत अभ्यासक्रमाला मात्र कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक आहे. आता वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या राज्य सरकारच्या कोट्यातील प्रवेशाची पुढील फेरी राष्ट्रीय स्तरावरील फेरीनंतर होणार आहे.

पहिल्या यादीतील प्रवेशाची आकडेवारी

अभ्यासक्रम – एकूण जागा – जाहीर – प्रवेश घेतले – नाकारले- रिक्त जागा

एमबीबीएस – ८,१३८ – ८,१०६ – ६,८४८ – १,२५७ – १,२९१

बीडीएस- २,७२५ – २,७०९ – ९६१ – १,७४६ – १,७६४