मुंबईच्या रस्त्यांवरून जाताना ‘खडखड’ वाजणाऱ्या आणि मुंबईकरांची हाडे खिळखिळी करणाऱ्या बेस्टच्या ताफ्यातील तब्बल ३०० जुनाट गाडय़ा येत्या दोन वर्षांत भंगारात निघणार आहेत. या गाडय़ांच्या बदल्यात बेस्ट येत्या दोन वर्षांत ३५० नव्याकोऱ्या गाडय़ा विकत घेणार आहे. या गाडय़ा दोन टप्प्यांमध्ये बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असून, त्याची निविदा प्रक्रिया येत्या डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
बेस्टच्या ताफ्यातील ४२०० पैकी जवळपास ३०० गाडय़ांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रस्त्यावरील खड्डे आणि १५ वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान यांमुळे या गाडय़ा प्रवाशांसाठी तापदायक ठरत आहेत. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षांच्या अखेपर्यंत अशा ११९ गाडय़ा आणि मार्च २०१६पर्यंत १८० गाडय़ा बेस्टच्या ताफ्यातून हद्दपार होतील. यामुळे बेस्टच्या ताफ्यात २९९ गाडय़ांची कमतरता भासणार आहे.
ही कमतरता दूर करण्यासाठी बेस्ट तब्बल ३५० नव्याकोऱ्या बसगाडय़ा विकत घेण्याचा विचार करत आहे.प्रत्येक बसची किंमत ४० ते ४५ लाख असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेस्टवर १४० ते १६० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
बस बांधणीबाबत नव्या सूचना
‘यूटीएस’ या केंद्रीय संस्थेतर्फे बस बांधणीचे काही निकष निश्चित केले आहेत. या निकषांनुसार बसचा सांगाडा लोखंडाचा असणे आवश्यक आहे. मात्र बेस्टने मुंबईच्या वातावरणाचा विचार करून लोखंडी सांगाडय़ांना विरोध केला आहे. मुंबईत खारी हवा असल्याने लोखंडाचे सांगाडे लवकर गंजतात. त्यामुळे लोखंडाऐवजी अ‍ॅल्युमिनियमचा वापर करावा, असे सूचित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बसचा पृष्ठभागही लाकडाऐवजी अ‍ॅल्युमिनियमचा असावा, अशी सूचना केली आहे.