२ ते २१ सप्टेंबपर्यंत गाडय़ा; आजपासून आरक्षण सुरू
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने कोकण मार्गावर आणखी ३८ विशेष गाडय़ांचे नियोजन केले आहे. या गाडय़ा २ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर यादरम्यान चालवल्या जाणार आहेत. या ३८ विशेष गाडय़ांचे आरक्षण २२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
०१०९१ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी ही गाडी २ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत सोमवार आणि गुरुवार वगळता आठवडय़ातून पाच दिवस रवाना होईल. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून मध्यरात्री १२.५५ वाजता सुटून त्याच दिवशी सकाळी ८.३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
तर ०१०९२ अप रत्नागिरी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडीही सोमवार आणि गुरुवार वगळता आठवडय़ातून पाच दिवस चालवली जाईल. ही गाडी रत्नागिरीहून दुपारी ३.४५ वाजता निघून रात्री ११.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीत वातानुकूलित थ्री टिअरचे चार, शयनयान श्रेणीचे सहा आणि साधारण श्रेणीचे सहा डबे असतील. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबेल.
०१०४३ डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी ही वातानुकूलित विशेष गाडी २ आणि ९ सप्टेंबर या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री ८.४५ वाजता निघेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता करमाळीला पोहोचेल.