मुंबई: गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली गुंतवणुकदारांची ३८० कोटी रुपयांंची फसवणूक करणाऱ्या अंबर दलालचा गेल्या १२ दिवसांपासून पाठलाग सुरू होता. मुंबईतून पलायन केल्यानंतर गुजरात, राजस्थान व उत्तराखंड या राज्यांत आरोपी वास्तव्याला होता. आरोपीने सुमारे एक हजार गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा संशय असून आतापर्यंत ६०० तक्रारदार पोलिसांकडे आले आहेत. त्यात अभिनेता अनु कपूरचाही समावेश आहे.

ओशिवरा पोलिसांनी १५ मार्च रोजी रिट्झ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे मालक दलाल यांच्याविरुद्ध सुरुवातीला डझनभर गुंतवणुकदारांची ५४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. जुहू येथील फॅशन डिझायनर बबिता मलकानी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तक्रारदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे फसवणुकीची रक्कम ३८० कोटी रुपये झाली आहे. आतापर्यंत ६०० तक्रारदार पोलिसांकडे आले आहेत.

हेही वाचा – अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर

तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये एका मैत्रिणीने तक्रारदार महिलेची अंबर दलालशी ओळख करून दिली होती. त्याने तिला गुंतवणुकीवर आकर्षक नफा देऊ केला. तसेच प्रत्येक महिन्याला १.५ ते १.८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. गुन्हा दाखल होणाच्या एक दिवस आधीच म्हणजे १४ मार्च रोजी अंबर दलालने पलायन केले. जुहू, अंधेरी व दहिसर परिसरात त्याचा पोलिसांनी शोध घेतला. पण तोपर्यंत दलाल गुजरातला पळाला होता. त्याच्या मागावर पोलीस पथक गुजरातला गेले. काही दिवस गुजरातमध्ये राहिल्यानंतर आरोपी राजस्थानला पळाला. तेथून तो उत्तराखंड येथे पळाला. या काळात त्याने सहा हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते.

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

हेही वाचा – वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी छोट्या हॉटेलमध्ये राहत होता. अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम, पोलीस निरीक्षक पांडुरंग गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आरोपीच्या मागावर उत्तराखंड येथे गेले होते. चार दिवस तेथे तळ ठोकून पोलिसांनी आरोपी दलालला तेथील तपोवर परिसरातून अटक केली. मुंबई पोलिसांनी १२ दिवस सतत आरोपीची माहिती घेऊन त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत २० बँक खाती गोठविण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ३६ बँकांशी संपर्क साधून आरोपीच्या बँक खात्यांबाबत माहिती मागवली आहे.