मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराला ३९ दिवस लागले तर खातेवाटपाला किती, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण विस्तार होऊन पाच दिवस उलटले तरी सारेच मंत्री अजूनही बिनखात्याचे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विस्तार कधी? या प्रश्नावर ‘लवकरच’ असे साचेबद्ध उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिले जाते. यावरूनच या सरकारला ‘लवकरच’ हा शब्द जास्त प्रिय असावा, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. शिंदे व फडणवीस यांच्या शपथविधीनंतर तब्बल ३९ दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. सोमवारी स्वातंत्र्य दिनापूर्वी तरी खातेवाटप होणार का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे मंत्रीपद मिळूनही खातेवाटप झालेले नसल्याने नव्या मंत्र्यांची अवघडल्यासारखी अवस्था झाली आहे.  खातेवाटपाची वाट बघत सर्वच मंत्र्यांनी गेले चार दिवस मुंबईत मुक्काम केला होता. सोमवारी स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यांमध्ये झेंडावंदन करण्याची जबाबदारी मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे. यानुसार बहुतांशी मंत्री आपापल्या जिल्ह्यांत शनिवारी दाखल झाले. मग जिल्ह्यात येताच या मंत्र्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राधाकृष्ण विखे-पाटील, संजय राठोड, गुलाबराव पाटील आदी मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघांत मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन केले. खातेवाटप होत नसल्याने या मंत्र्यांमध्येही अस्वस्थता आहे. कारण कोणते खाते मिळणार याची काहीच कल्पना या मंत्र्यांना देण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून काहीच नाराजी नाही, असा देखावा शिंदे गटाकडून सातत्याने केला जात आहे; परंतु औरंगाबादचे संजय शिरसाट यांनी आपल्याला पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळायला हवे होते, असे वक्तव्य केले. तसेच पुढील विस्तारात मंत्रीपद आणि औरंगाबादचे पालकमंत्रीपद मिळावे, अशी मागणी आपण शिंदे यांच्याकडे केल्याचे शिरसाट यांनी सांगितल्याने शिंदे गटात सारे काही आलबेल नाही हेच स्पष्ट होते. दुसरीकडे, शिरसाट यांच्या ट्वीटवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी बंड केलेल्या आमदारांना आपण चूक केल्याची भावना झाल्याची टीका केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 39 days expansion allocation ministers cabinet politics ysh
First published on: 14-08-2022 at 00:50 IST