पुणे, नागपूरमधील जलसाठा आटला ; मुंबई, कोकणात समाधानकारक जलस्थिती

उन्हाचे चटके बसू लागल्याने राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत. सध्या जलाशयांमध्ये ४० टक्के साठा असला व गतवर्षांच्या तुलनेत साठा समाधानकारक असला तरी पुणे आणि नागपूर विभागांतील पाण्याचा साठा घटला आहे. पुणे विभागात टँकर्सची संख्या वाढवावी लागण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने राज्यातील सर्व धरणे चांगली भरली होती. यामुळे यंदा उन्हाळ्यात तेवढी पाण्याची समस्या निर्माण होणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती; पण पाण्याचा साठा आता कमी होऊ लागला आहे.

त्यातच कडक उन्हाळा सुरू झाल्यावर बाष्पीभवनामुळे पाण्याचा साठा कमी होतो. महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असलेल्या पश्चिम भारतातील जलाशयांमध्ये यंदा समाधानकारक साठा असल्याचा निष्कर्ष केंद्र सरकारने काढला आहे. पश्चिम भारतात एकूण साठवणूक क्षेत्राच्या ४५ टक्के साठा आहे. गेल्या काही वर्षांतील हा साठा अधिक असल्याचे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

  • कोकण, मराठवाडा आणि नाशिक विभागांमध्ये जलाशयांमधील साठा समाधानकारक असला तरी पुणे विभागात पाणी कमी झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात आतापासूनच टँकर्सची संख्या वाढू लागली आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर पाण्याची स्थिती चिंताजनक होती.

जलाशयांमधील विभागनिहाय साठा पुढीलप्रमाणे

कोकण (६२.१० टक्के), अमरावती (३९.७० टक्के), नागपूर (२५.५० टक्के), नाशिक (३९.१३ टक्के), पुणे (३७.३६ टक्के), मराठवाडा (४२.१६ टक्के). राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या ३९.७२ टक्के साठा आहे. गतवर्षी याच काळात राज्यात १७.७३ टक्के साठा होता. गतवर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट साठा शिल्लक आहे. दर आठवडय़ाला जलाशयांमधील दोन टक्के साठा कमी होत जातो. पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून सरकारने आतापासूनच खबरदारीचे उपाय योजण्यास सुरुवात केली आहे.

  • मुंबई व ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये समाधानकारक परिस्थिती आहे. भातसामध्ये ५५ टक्के पाणी आहे. तानसा (९६.२६ टक्के), बारवी (५७ टक्के), मोडकसागर (८९ टक्के), मुळशी टाटा (२९ टक्के).

जलाशयांमधील साठा

  • भातसा (५५.१४ टक्के),
  • कोयना (४०.७१ टक्के),
  • तिल्लारी (६२.१३ टक्के),
  • निळवंडे (३५ टक्के),
  • भंडारधरा (६४ टक्के),
  • तुळशी (६३ टक्के),
  • दुधगंगा (५० टक्के),
  • खडकवासला (८३ टक्के),
  • निरा देवघर (२८ टक्के),
  • पवना (४९ टक्के),
  • पानशेत (६६.३८ टक्के),
  • तारळी (५८ टक्के),
  • भीमा उजनी (२० टक्के),
  • निम्न तेरणा (७५ टक्के)