४,७६२ गुन्ह्यंचा तपास, ५,०६३ आरोपींना अटक; गुन्ह्य़ांचा छडा लावण्याचे प्रमाण कमीच

मुंबई : उपनगरीय मार्गावर लोकल पकडण्यासाठीची धावपळ, गर्दी या मनस्तापात स्थानक हद्दीत होणाऱ्या चोऱ्यांचीही भर पडल्याचे दिसत आहे. मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर जानेवारी २०१९ पासून ते एप्रिल २०२१ पर्यंत तब्बल ४० हजार ४५७ चोरीच्या तक्रारी झाल्या असून त्या तुलनेत गुन्ह्य़ांचा छडा लावण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे दिसत आहे. फक्त ४ हजार ७६२ गुन्ह्य़ांचा तपास करण्यातच पोलिसांना यश आले आहे. आतापर्यंत ५ हजार ६३ आरोपींना अटक के ली असून चोऱ्या रोखण्याचे मोठे आव्हान लोहमार्ग पोलिसांसमोर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपनगरीय रेल्वेत गुन्ह्य़ांना आळा घालण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांकडे असून रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा राखणे आणि लोहमार्ग पोलिसांना गुन्हे तपासकामात मदत करण्याची जबाबदारी आहे. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला असून कमी मनुष्यबळामुळे प्रवाशांची सुरक्षा करताना लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाची नेहमीच दमछाक होते, तरीही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचा दावा या दोन्ही पोलीस विभागांकडून केला जातो. मात्र चोरीच्या घटनांच्या संख्येने हा दावा खोटा ठरवला आहे. मोबाइल चोरी, पाकीटमारी, सोन्याच्या चैन आणि मंगळसूत्र चोरीबरोबरच प्रवाशांच्या लोकल डब्यातील बॅग लंपास करण्याचे गुन्हे लोकल प्रवासात घडतात. त्याबद्दल प्रवाशांकडून तक्रारी दाखल केल्या जातात. परंतु गुन्ह्य़ांचा यशस्वी तपास करून प्रवाशांच्या वस्तू मिळवण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे दिसत आहे.

जानेवारी २०१९ ते एप्रिल २०२१ पर्यंत ४०,४५७ विविध चोऱ्यांची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे झाली. यात अवघ्या ४,७६२ गुन्ह्य़ांचा तपास करण्यात यश आले. या कालावधीत मध्य रेल्वेवर गुन्ह्य़ांचे प्रमाण अधिक राहिले असून २६,४४८ चोऱ्या व २,८०७ चोऱ्यांच्या तपासात गुन्हेगारांना अटक के ली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर १४,००९ चोऱ्या झाल्या असून १,९५५ चोऱ्यांचा छडा लावला आहे. या सव्वा दोन वर्षांत ५,०६३ चोरांची धरपकड करताना २,९५६ चोरांना मध्य रेल्वेवर आणि २,१०७ चोरांना पश्चिम रेल्वे मार्गावर अटक केल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

मोबाइल चोरी अधिक

रेल्वे प्रवासात महागडय़ा मोबाइलवरच चोरांकडून डल्ला मारण्यात येतो. २०१९ ते एप्रिल २०२१ पर्यंत ३०,२७५ मोबाइल चोऱ्या झाल्या आहेत. यात मध्य रेल्वेवर मोबाइल चोऱ्या अधिक असून १९,५२१ मोबाइल लंपास केल्याचे सांगितले, तर पश्चिम रेल्वेवर १०,७५४ मोबाइल चोरीला गेल्याची नोंद झाली आहे. मध्य रेल्वेवर २,५८३ मोबाइल आणि पश्चिम रेल्वेवर १,७४२ मोबाइल परत मिळवण्यात आले आहेत. सोन्याच्या चैन, मंगळसूत्रही लंपास करण्यात आले असून  मध्य रेल्वेवर या १२९ आणि पश्चिम रेल्वेवर ६९ चोऱ्या झाल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40000 thefts mumbai railway boundary 15 years ssh
First published on: 05-06-2021 at 01:50 IST