तांत्रिक समस्या सोडवण्याचे पश्चिम रेल्वेचे प्रयत्न सुरूच
दीड वर्षांपूर्वी मुंबईत दाखल झालेली आणि प्रवाशांच्या सेवेत अद्याप दाखल न झालेली ‘वातानुकूलित लोकल गाडी’ १ जानेवारीपासूनच सेवेत येण्याची चिन्हे आहेत. मात्र सेवेत येण्यापूर्वीच अनेक तांत्रिक समस्यांनी वातानुकूलित लोकल गाडीला घेरले आहे. अद्याप ५० तांत्रिक समस्या सुटलेल्या नसून त्या सोडविण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. वातानुकूलित लोकल सुरू होताच ‘फज्जा’ उडू नये यासाठी रेल्वेकडून दिवस-रात्र लोकलच्या चाचण्यांसह अन्य तांत्रिक चाचण्याही घेतल्या जात असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. १ जानेवारीआधी वातानुकूलित लोकल २५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा पश्चिम रेल्वेचा प्रयत्न होता.
बारा डब्यांची आणि ५४ कोटी रुपये किमतीची पहिली वातानुकूलित लोकल गाडी मध्य रेल्वेवर दाखल झाली होती. लोकल दाखल होताच त्याच्या मध्य रेल्वेकडून कर्जत, कसारा आणि अन्य मार्गावर चाचण्या घेण्यात आल्या. परंतु लोकलची अधिक असलेली उंची आणि कुर्ला ते सीएसएमटीदरम्यान कमी उंचीचे पूल यामुळे मोठा तांत्रिक पेच उभा राहिला. अखेर मध्य रेल्वेने लोकल चालवण्यास नकार दिला. त्यानंतर रेल्वे बोर्डाने पश्चिम रेल्वेला लोकल चालविण्याची विचारणा केली आणि पश्चिम रेल्वेने त्याला होकारही दिला. गेल्या काही महिन्यांपासून या लोकलच्या चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्या घेत असतानाच १ जानेवारी २०१८ पासून वातानुकूलित लोकल धावेल, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच केली होती. परंतु पश्चिम रेल्वेचा २५ डिसेंबरपासून लोकल चालवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. आता गुजरात मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमामुळे पुन्हा १ जानेवारीपासूनच वातानुकूलित लोकल गाडी चालवण्याचा विचार केला जात आहे.
लोकलच्या चाचण्या आणि कारशेडमध्ये त्याची तपासणी करताना पश्चिम रेल्वेला जवळपास ८९ तांत्रिक समस्यांची यादीच सापडली आहे. आतापर्यंत ३९ समस्या सोडवण्यात पश्चिम रेल्वेला यश आले आहे. तर ५० तांत्रिक समस्या युद्धपातळीवर सोडविल्या जात आहेत.
समस्या कोणत्या?
- लोकलमधील वातानुकूलित यंत्रणेत समस्या
- स्वयंचलित दरवाजा बंद आणि उघडण्यात अडचण. ही यंत्रणा गार्डकडून हाताळण्यात येणार
- डब्यातील ‘प्रवासी उद्घोषणा यंत्रणा’ होताना अडचण
- सध्याच्या लोकलमधील डब्यात आपत्कालीन परिस्थितीत लोकल थांबविण्यासाठी प्रवाशांना साखळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. चैन खेचल्यानंतर थांबलेली लोकल पूर्ववत करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्याकडून डब्याच्या बाहेरील बाजूला असलेली यंत्रणा पूर्ववत करून लोकल पुढे जाण्याचा मार्ग मोकळा केला जातो. परंतु वातानुकूलित लोकलमधील डब्यातच या दोन्ही यंत्रणा असून गर्दीच्या वेळी रेल्वे कर्मचारी यंत्रणा पूर्ववत करणार कसा असा सवाल आहे.