मुंबई : परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये ५६ वर्षीय रुग्णावर ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियासारख्या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल विकारावर यशस्वी उपचार करण्यात आले. दशकभर असह्य वेदना सहन करणाऱ्या रुग्णाला ‘मायक्रो व्हॅस्क्युलर डिकॉम्प्रेशन’ (एमव्हीडी) या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे आजाराच्या मुळावर उपाय मिळाला.
चेहरा, कपाळ, हनुवटी, हिरड्या किंवा नाकपुडीवर तीव्र व असह्य वेदना निर्माण करणारा ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया हा विकार अनेकदा चुकीच्या निदानामुळे दुर्लक्षित होतो. रुग्ण सुशील वर्मा हे दहा वर्षांपासून वेदना सहन करत होते. सुरुवातीला चुकीचे निदान झाल्याने त्यांचे दातही काढण्यात आले, मात्र यातून काहीही आराम न मिळाल्याने उच्च डोसची औषधे वर्षानुवर्षे घ्यावी लागली. वेदनांमुळे खाणे, बोलणे,अगदी हसणे देखील अशक्य झाले होते. परिस्थिती इतकी बिघडली की नैराश्यामुळे आत्महत्येचे विचार येऊ लागले होते.
ग्लेनईगल्स हॉस्पिटलचे संचालक (इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी व न्यूरोसर्जरी) आणि स्पाइन विभाग प्रमुख डॉ. नितीन डांगे, डॉ. कुशल भाटिया व डॉ. मयूर घरत यांच्या टीमने वर्मा यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. एमआरआय चाचणीत चेहऱ्याच्या संवेदनांना मेंदूपर्यंत पोहोचवणाऱ्या ट्रायजेमिनल नसेवर रक्तवाहिनीचा दाब असल्याचे स्पष्ट झाले. दुर्बिणीच्या साहाय्याने करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेत रक्तवाहिनीला नसेपासून अलग ठेवून त्यांच्या मध्ये ‘टेफ्लॉन स्पंज’ ठेवण्यात आला. तीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या.
गेल्या दहा वर्षांत मी असह्य वेदना सहन करत होतो. आत्महत्येचे विचार मनात येऊ लागले होते. पण डॉ. डांगे आणि त्यांच्या टीममुळे मला नवजीवन मिळाले. आज मी पूर्णपणे वेदनामुक्त आहे, अशी भावना वर्मा यांनी व्यक्त केली. जगभरात दरवर्षी १००,००० लोकांमागे सुमारे १२ जणांना या आजाराचे निदान होते. औषधे तात्पुरता दिलासा देतात; मात्र अनेक रुग्णांना अखेरीस एमव्हीडी, रेडिओफ्रिक्वेन्सी अॅब्लेशन किंवा गॅमा नाइफ रेडिओसर्जरीसारख्या प्रगत उपचारांची गरज भासते. उपचार न घेतल्यास रुग्णांना अपंगत्व, वजन घटणे, नैराश्य आणि सततची थकवा यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात, असे डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले. वेळीच निदान आणि प्रगत न्यूरोसर्जिकल उपचार यांचे महत्त्व या प्रकरणातून अधोरेखित होते. जटिल न्यूरोलॉजिकल विकारांनी ग्रस्त रुग्णांना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक उपचार देण्यास हॉस्पिटल वचनबद्ध असल्याचे रुग्णालयाचे सीईओ डॉ. बिपिन चेवले यांनी स्पष्ट केले.