माजी नगरसेविकेच्या मुलासह सहा जणांना अटक; अन्य तिघांचा शोध सुरू

चोरून काढलेली अश्लील चित्रफीत पसरवू (व्हायरल करू) अशी धमकी देत तब्बल वर्षभर एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर परिसरातल्याच नऊ तरुणांनी शारीरिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. रविवारी विलेपार्ले पोलिसांनी यापैकी सहा तरुणांना अटक केली असून अटक आरोपींमध्ये एका माजी नगरसेविकेच्या मुलाचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात, एकमेकांना ओळखतात. वर्षभरापूर्वी एका आरोपीने स्वत:च्या घरात याच मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रसंग आरोपीच्या मित्राने आपल्या भ्रमणध्वनीत चोरून कैद केला. पुढे ही चित्रफीत त्या मुलीला दाखवण्यात आली. चित्रफीत सगळीकडे पसरवली गेली तर बदनामी होईल, आई-वडील तुला मारतील, सगळे हसतील, चिडवतील अशी भीती घालून दोघांनी त्या मुलीवर अत्याचार सुरू केले.

ही चित्रफीत त्या दोघांकडून त्यांच्या अन्य सात मित्रांकडे, ओळखीतल्या तरुणांकडे पोहोचली. त्याचा फायदा घेत या सात जणांनीही या मुलीवर अत्याचार सुरू केले. सततच्या अत्याचारांमुळे मुलगी अबोल झाली, तिची प्रकृतीही खालावली. आपल्या मुलीत झालेले हे बदल तिच्या आईला जाणवले आणि तिने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. मुलीने आईला सर्व काही सांगितल्यानंतर तातडीने विलेपार्ले पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली.

१२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

त्या मुलीचा जबाब नोंदवून पोलिसांनी नऊ आरोपींविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, माहिती तंत्रज्ञान कायद्यासह भारतीय दंड विधानातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने या आरोपींना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

आरोपींची गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासणार

तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलीवर करण्यात आलेल्या अत्याचाराचे परिणाम तिच्यावर दिसत असून पोलिसांकडून या मुलीचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत आहे. आरोपी आणि या मुलीच्या वैद्यकीय चाचण्या तपासाच्या दृष्टीने आवश्यक असून सोमवारी नागपाडा येथील पोलीस रुग्णालयात त्या केल्या जाणार आहेत. एका आरोपीची आई माजी नगरसेविका असून यंदाची महापालिका निवडणूक त्यांनी भारतीय जनता पक्षातर्फे लढवली असल्याची माहिती आरोपींकडे केलेल्या चौकशीतून पोलिसांना मिळाली आहे. आम्ही आरोपींची गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासणार आहोत. आरोपी कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे का, ही बाब गुन्ह्याच्या तपासाशी संबंधित नसल्याचे विलेपार्ले पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.