मुंबई : जवळपास ६० कोटी रुपयांचा फसवणुकीच्या आरोपाप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा व्यावसायिक पती राज कुंद्रा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुन्हा रद्द करण्याच्या मागणीव्यतिरिक्त, या दाम्पत्याने पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यापासून मज्जाव करणे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कावाई न करण्याचे आदेश देण्याची मागणी देखील केली आहे.
मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे शिल्पा आणि राज यांच्या याचिका सोमवारी सुनावणीसाठी आल्या. त्यावेळी, याचिकेची प्रत मूळ तक्रारदार दीपक कोठारी यांना देण्याचे आदेश देऊन न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी २० नोव्हेंबर रोजी ठेवली.
खोट्या तथ्यांच्या आधारावर तसेच पैसे उकळण्याच्या दुष्ट हेतूने आपल्याविरुद्ध फौजदारी तक्रार करण्यात आल्याचा दावा या दाम्पत्याने याचिकांमध्ये केला आहे. कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी नव्हतो, तर फारच मर्यादित काळासाठी कंपनीशी संबंध आल्याचा दावा शिल्पा हिने याचिकेत केला आहे. त्याचप्रमाणे, अनपेक्षित आर्थिक परिस्थितीमुळे कंपनीचे नुकसान झाले, विशेषतः नोव्हेंबर २०१६ मध्ये निश्चलीकरणामुळे रोखीवर आधारित व्यवसायावर गंभीर परिणाम झाला. तसेच झालेले नुकसान केवळ व्यावसायिक नुकसान होते आणि कोणालाही फसवण्याचे किंवा गुन्हेगारी कटाचा हा भाग नव्हते, असा दावाही शिल्पा आणि राज यांनी याचिकेत केला आहे.
प्रकरण काय ?
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ या ऑनलाइन शॉपिंग कंपनीचे संचालक होते. फिर्यादी व्यवसायिक दीपक कोठारी यांनी २०१५ ते २०२३ दरम्यान या कंपनीत ६० कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या कंपनीतील ८७.६ टक्के समभाग या दोघांच्या नावावर होते, कोठारी यांनी एप्रिल २०१५ मध्ये ‘शेअर सबस्क्रिप्शन अॅग्रीमेंट’ अंतर्गत कंपनीत ३१.९ कोटी रुपये गुंतवले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये विस्तारित करारांतर्गत आणखी २८.५३ कोटी रुपये वळवते केले. मात्र, शिल्पा आणि राज यांनी ही रक्कम वैयक्तिक खर्चांसाठी वापरली, असा आरोप कोठारी यांनी पोलिसांत दाखल तक्रारीत केला आहे.
