मुंबई : बॅंकॉंकवरून दुर्मीळ प्राण्यांची तस्करी करून मुंबईत आणणाऱ्या एका प्रवाशाला सीमा उत्पादन शुल्क विभागाने अटक केली. त्याने तस्करी करून विविध प्रकारचे ६८ वन्य प्राणी, पक्षी आणले होते. त्यात सरडे, कासव, ससे, पोपट आदी प्राण्यांचा समावेश आहे.
एक प्रवासी बॅंकॉकवरून (व्हीझेड ७६०) या विमानाने मुंबईत येणार असून तो दुर्मीळ वन्यजीव आणणार असल्याची माहीत सीमा उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या प्रवासी बॅगेची तपासणी केली असता त्यात लपवून आणलेले एकूण ६८ वन्यजीव आढळले.
त्यात मीरकॅट (दक्षिण आफ्रिकेतील कोल्ह्यासारखा लहान प्राणी), २ हाय्रॅक्स जातीचे ससे, २ शुगर ग्लायडर खार, ४ मोठा फिग-आयड पोपट, १० हिरवा बॅसिलिस्क सरडा, २० चित्तेदार कासव, ४ पांढरट (अल्बिनो) लालकानाचे कासव, २ निळी जीभ असलेला स्किंक सरडा, १२ दाढीवाला ड्रॅगन सरडा, १ ड्युमेरिल मॉनिटर सरडा, २ क्विन्स मॉनिटर सरडा, ५ पाणी मॉनिटर सरडा आदींचा समावेश आहे.
सदर प्रवाशाला सीमाशुल्क अधिनियम आणि वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली. या प्रवाशाकडे सरडे, कासवे, पोपट आणि काही लहान सस्तन प्राणी सापडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व घटनांमध्ये तस्करांनी प्राण्यांना गुप्तपणे सामानात लपवले होते. वन्यजीव बचाव करणाऱ्या संस्थांच्या मदतीने या प्राण्यांची ओळख पटवून त्यांची काळजी घेण्यात आली आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोतर्फे या प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यात आले.
बॅंकॉकवरून सर्वाधिक वन्यजीव तस्करी
याबाबत माहिती देताना सीमा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, थायलंड हा दुर्मीळ वन्यजीव प्राण्यांचा सर्वात मोठा देश आहे. तेथे मोठ्या प्रमाणात असे ‘एक्झॉटिक’ प्राणी पाळले जातात. थायलंडमध्ये याला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे देश – विदेशातील विक्रेते आणि तस्कर थायलंडमध्ये येत असतात. ऑनलाईन आणि समाज माध्यमाद्वारे ते स्थानिक विक्रेते आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी सहज संपर्क साधतात. अनेक देशांतून खास आणि दुर्मिळ प्रजातींच्या वन्यजीवांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. असे प्राणा पाळण्यासाठी, खेळासाठी तसेच औषधासाठी उपयोगात आणले जातात. बॅंकॉकमधून थेट विमान सेवा आहे आणि तेथून वन्यजीव आणणे किफायतशीर असल्याचेही या अधिकार्याने सांगितले.
वन्यजीव प्राणी पक्षी तस्करी म्हणजे काय ?
भारतात वन्यजीवांची तस्करी हा एक गंभीर गुन्हा मानला जातो आणि यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा आणि कस्टम्स कायद्यानुसार कारवाई केली जाते. वन्यजीव तस्करी म्हणजे निसर्गातील प्राणी, पक्षी,एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजे वन्यजीवांची तस्करी होते. कायदेशीर परवानगीशिवाय या प्राणी पक्ष्यांना पकडून, विकले जाते, त्यांची आयात–निर्यात केली जाते. यासाठी जीवित प्राण्यांना बंधनात, लपवून ठेवले जाते. त्यामुळे अनेकदा ते मरण पावतात.