आज अधिसूचना; सूचनांसाठी ३० दिवसांची मुदत
सध्याची पनवेल नगरपालिका आणि परिसरातील तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली, बोनशेत, पळस्पे, नेवाळी आदी ६८ गावांचा समावेश करून रायगड जिल्हय़ातील पहिली पनवेल महापालिका स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची अधिसूचना शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे.
नवी मुंबई-पनवेल-उरण परिसरांतील वाढते नागरीकरण आणि त्याचा पायाभूत सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन पनवेल आणि परिसराचे योग्य नियोजन करण्यासाठी पनवेल महापालिका स्थापन करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. विभागीय आयुक्तांनी सादर केलेला अहवाल नगरविकास विभागाने स्वीकारला आहे. त्यानुसार पनवेल नगरपालिकेच्या हद्दीबाहेरच्या ६८ गावांचा समावेश करून नवी महापालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या प्रस्तावास मान्यता दिली. त्यानुसार २०११ च्या जनगणनेनुसार पनवेल महापालिकेची लोकसंख्या पाच लाख ४५ हजार असली तरी सध्या या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या आठ लाखांच्या आसपास असेल. नगरपालिकेच्या हद्दीबाहेरील आणि पनवेल परिसरातील पुढील गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला असून त्याबाबतची अधिसूचना शुक्रवारी प्रसिद्घ होईल. प्राथमिक अधिसूचेनुसार ३० दिवसांत लोकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.