मुंबईः मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचा बनाव करून कॅफे म्हैसूर या हॉटेलच्या मालकाला ७२ लाख रुपयांना लुटल्याप्रकरणी लवकरच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी आठ जणांना शीव पोलिसांनी अटक केली होती.
तक्रारदार नरेश नायक या व्यावसायिकाच्या घरी सहा आरोपींनी जाऊन निवडणुकीसाठीचा काळापैसा घरी ठेवल्याचा आरोप केला आणि ७२ लाख रुपयांची खंडणी उकळली होती. या प्रकरणी व्यावसयिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, शीव पोलीस ठाण्यात भादंवि कलम १७०, ४२०, ४५२, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक
गुन्हा घडला त्याचदिवशी पोलीस कर्मचारी बाबासाहेब भागवत (५०) आणि निवृत्त पोलीस कर्मचारी दिनकर साळवे (६०) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, या प्रकरणी सागर रेडेकर (४२), वसंत नाईक (५२), श्याम गायकवाड ( ५२) आणि नीरज खंडागळे (३५) या चौघांना अटक केली. अटक आरोपींच्या चौकशीत आणखी दोन नावे उघड झाल्यानंतर पोलिसांनी नालासोपारा येथून हिरेन वाघेला आणि गोरेगाव येथून अजित अपराज या दोन आरोपींना अटक केली होती.
आता या प्रकरणी लवकरच मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी सुरुवातीला २५ लाख रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप होता. त्यानंतर आरोपींनी एकूण ७२ लाख रुपये लुटल्याचे समजले. या प्रकरणी आणखी चार सोन्याच्या लगडी गायब असून ही रक्कम चार कोटींपेक्षा अधिक असण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.