मुंबई…फेसबुक पहात असताना कोडी सोडविण्याचा खेळ ७९ वर्षीय वृध्देला चांगलाच महागात पडला आहे. १ कोटींचे बक्षिस लागले आहे असे सांगून या वृध्द महिलेकडून वेगवेगळ्या कारणाने २१ लाख रुपये उकळण्यात आले आहेत. उत्तर सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित वृध्दा ७९ वर्षांची आहे. ती मूळ गोरेगाव येथे राहणारी असून सध्या त्यांच्या इमारतीच्या पुनर्वविकासाचे काम सुरू असल्याने त्या कांदिवलीच्या चारकोप येथे मागील ३ महिन्यांपासून रहात आहेत. त्या फेसबुक या समाजमाध्यमावर सक्रीय असतात. एप्रिल २०२५ मध्ये त्या फेसबुक बघत असताना एक खेळ समोर दिसला. त्यांनी सहज, गंमत म्हणून त्यातील प्रश्नाची उत्तरे दिली. ती अचूक निघाली. त्यानंतर त्यांना ‘हेडगे फंड मॅनेजर’ या कंपनीतून फोन आला. तुम्ही दिलेली सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक असून तुम्हाला १०० मिलियन (१ कोटी) रुपयांचे बक्षिस लागल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.

आमिष दाखवून पैसे उकळले…

वृध्देचा मुलगा पुनर्वसन केंद्रात उपचार घेत आहे. त्यामुळे त्यांना पैशांची गरज होती. त्यातच आयतेच १ कोटी रुपये मिळणार असल्याने त्या वृध्देला आनंद झाला. जिंकलेली १ कोटी रुपयांची रक्कम कशी मिळेल अशी त्यांनी विचारणा केली. त्यावेळी ठकसेनांनी त्यांना एक लिंक पाठवली. भामट्यांनी त्यांना ७५ हजार रुपये प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) म्हणून भरण्यास सांगितले.

पैसे उसने घेतले

वृध्देला ऑनलाईन बँकेचे व्यवहार जमत नव्हते. त्यामुळे गुगलपेद्वारे त्यांना पैसे पाठवता आले नाहीत. मग डॉ स्टीफन नावाच्या ठकसेनाने त्यांना बॅंक खात्याचे तपशील देऊन त्यावर पैसे भरण्यासाठी सांगितले. सुरवातीचे प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) भरल्याशिवाय पुढील रक्कम मिळणार नाही असे त्यांना सांगण्यात आले. वृध्देने साठवलेले पैसे, तसेच परिचितांकडून पैसे उसने घेतले आणि भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यात भरत गेल्या. या काळात मला बक्षिसाचे १ कोटी कधी मिळतील अशी त्या विचारणा करत होत्या. ही शेवटची रक्कम भरल्यावर मिळतील असे सांगत त्यांना झुलवत ठेवण्यात आले. १ कोटी मिळतील या आशेवर ती वृध्दा पैसे भरत गेली. २८ एप्रिल ते २१ जून या कालावधीत त्यांनी तब्बल २१ लाख २३ हजार ७०० रुपये बँक खात्यात भरले होेते.

मैत्रीणीला संशय आला

२१ लाख रुपये भरूनही सायबर भामटे वृध्देकडे पैशांची मागणी करतच होते. शेवटचे ८५ हजार रुपये भरण्यास त्यांना सांगण्यात आले. वृध्देकडील सर्व पैसे आधीच संपले होेते. त्यांनी मग आपल्या मैत्रीणीकडून पैसे उसने घेतले. परंतु मैत्रीणीला संशय आला आणि तिने विचारणा केली. हा प्रकार फसवणुकीचा आहे असे मैत्रीणीने त्या वृध्देला सांगितले. वृध्देने संबंधित व्यक्तीला फोन केला तेव्हा तुमचे ॲप बंद झाले असून यापुढे तुम्हाला काहीच पैसे मिळणार नाही असे सांगण्यात आले.

उत्तर सायबर पोलिसात गुन्हे दाखल

वृध्दा मोठ्या आशेने १ कोटींच्या बक्षिसाची वाट बघत होती. परंतु ती रक्कम तर मिळालीच नाही उलट घरात साठवलेले आणि उसनवारी घेऊन जमा केलेले २१ लाख रुपये सायबर भामट्यांनी घेतले होते. या प्रकरणी उत्तर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क), ६६ (ड) तसेच फसवणुकीप्रकरणी कलम ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८ आणि ३४० (२) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.