मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आरामबस आणि डिझेल टँकरची धडक होवून झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरपासून १० किमी अंतरावरील कुडे गावाजवळ बुधवारी पहाटे १:४० वाजता हा भीषण अपघात झाला.
पुण्याहून अहमदाबादला चाललेल्या पर्पल ट्रॅव्हलसच्या आरामबसने गुजरातच्या दिशेने निघालेल्या ‘बीपीसीएल’च्या डिझेल टँकरला मागच्याबाजून जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताची भीषणता एवढी होती की आरामबस आणि डिझेल टँकरने धडक होताच पेट घेतला. पेट घेतलेल्या आरामबसवर मागून येणारी एक कार आदळल्याने कारनेदेखील पेट घेतला. बसमधील मृतदेह संपूर्ण जळाले असल्याने मृतांची ओळख पटली नसल्याचे पालिसांनी सांगितले. अपघातामधील जखमींवर मनोरच्या ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पालघरचे तहसिलदार सुरेंद्र नवले, पोलिस अधिक्षक अनिल कुंभारे यांनी घटनास्थळी जावून स्थानिकांच्या मदतीने जखमींना रूग्णालयामध्ये हलवण्यास मदत केली.
दरम्यान, विरार ते मनोर पर्यंत महामार्गावर रात्री २ वाजल्यापासून वाहतूकीची कोंडी झाली असून, वाहतूक वाडा-भिवंडी मार्गे वळवण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.