मुंबई : रेल्वे पोलिसांच्या खंडणी प्रकरणात आणखी आठ पोलिसांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. बॅगा तपासण्याच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांकडून खंडणी उकळली जात होती. याप्रकरणी आतापर्यंत १६ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रेल्वे स्थानकात बंदोबस्तासाठी असलेल्या रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांची लूट केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. प्रवाशांचे सामान तपासण्याच्या बहाण्याने त्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्यात येत होती. याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी आणखी आठ पोलिसांची मुख्यालयात बदली केली आहे. त्यात हेड कॉन्स्टेबल सुजाता गायकवाडचा समावेश आहे. गायकवाडची बहिण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया इंगवले हिला वांद्रे येथील खंडणी प्रकरणात यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.
१३ पोलीस निलंबित, ४ पोलिसांविरोधात गुन्हे
पोलीस आयुक्तांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून प्रवाशांच्या तक्रारी नोंदविण्यात येत आहेत. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी चार पोलिसांविरोधात खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५ सप्टेंबर रोजी आठ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत मुख्यालयात बदली करण्यात आलेल्या पोलिसांची संख्या १६ वर गेली आहे. अशा घटना रोखण्यासाठी बॅगा तपासण्याच्या नियमात बदल करण्यात आले आहे. केवळ सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखालीच बॅगा तपासाव्यात, खोलीत किंवा एकांतात बॅगा तपासण्यास मनाई करण्यात आली आहे.