म्हैसाळ गर्भपात प्रकरणानंतरची कारवाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबंध राज्याला हादरवून टाकणाऱ्या म्हैसाळ बेकायदा गर्भपात व मृत्यू प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने राबविलेल्या धडक मोहिमेत राज्यभरात विविध खासगी रुग्णालयांत ८४ बोगस डॉक्टर काम करीत असल्याचे आढळून आले आहे. या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सांगली जिल्ह्य़ातील म्हैसाळ येथे भारती रुग्णालयात गर्भपात करताना स्वाती जमदाडे या २६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यातून या रुग्णालयात बेकायदा गर्भपात केला जात असल्याची माहिती उघडकीस आली. या प्रकरणात रुग्णालयाचा प्रमुख डॉ. खिद्रापुरे याच्यासह आणखी काही डॉक्टर, कर्मचारी व दलालांना अटक करण्यात आली.

म्हैसाळ प्रकरणानंतर, राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या हेल्पलाइनवर राज्यभरातून बोगस डॉक्टरांबाबत तक्रारी येऊ लागल्या. त्याची दखल घेऊन राज्यभर बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी व शल्यचिकित्सक यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहिमेत अनेक जिल्ह्य़ांमध्ये विविध खासगी रुग्णालयांमध्ये ८४ बोगस डॉक्टर काम करीत असल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी माहिती अधिकारात केलेल्या मागणीनुसार बोगस डॉक्टरांबाबतचा हा तपशील देण्यात आला आहे.

कुटुंबकल्याण कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्य़ात सर्वाधिक म्हणजे ३१ बोगस डॉक्टर विविध खासगी रुग्णालयांत कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. अकोला जिल्ह्य़ात १४, तर कोल्हापूर जिल्ह्य़ात ११ बोगस डॉक्टरांचा शोध लागला आहे. जळगाव जिल्ह्य़ात सहा बोगस डॉक्टरांचा छडा लागला आहे. परभणी, पुणे, बुलढाणा, धुळे, नागपूर, सांगली, मुंबई, औरंगाबाद, अमरावती या जिल्ह्य़ांमध्येही बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. परंतु त्याचे प्रमाण अगदी किरकोळ आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 84 fake doctors found working in private hospitals across maharashtra
First published on: 22-07-2017 at 03:30 IST