अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही साहित्यप्रेमी आणि वाचक मोठय़ा संख्येने हजेरी लावत असतात. या वेळचे संमेलन पंजाबमधील घुमान येथे होणार असून येथे जाणाऱ्या साहित्यप्रेमींची गैरसोय होऊ नये म्हणून ‘साहित्य संमेलन विशेष एक्स्प्रेस’ अशा दोन गाडय़ा सोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसरडा यांच्या संकल्पनेतून हा आगळा प्रयोग साकारणार आहे.   
 पुढील वर्षी एप्रिल महिन्यात पहिल्या आठवडय़ात ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपूरच्या वारकऱ्यांप्रमाणेच साहित्ययात्रेतील सर्व वारकरी तेथे एकत्र जावेत, या उद्देशाने साहित्य संमेलन एक्स्प्रेस सोडण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्षभारत देसरडा यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात पत्र सादर केले असून ते पत्र त्यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे पाठविले जाईल. येत्या आठ दिवसात यावर सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करून देसरडा म्हणाले, ही गाडी दोन मार्गावरून चालविली जावी, असा आमचा प्रयत्न आहे. कल्याण-पुणे-नाशिक आणि नांदेड-परभणी अशा दोन मार्गावरून या गाडय़ा १ एप्रिल रोजी सोडण्याची मागणी आम्ही केली आहे. संमेलन संपले की ५ एप्रिल रोजी पुन्हा परतीसाठीही गाडय़ा उपलब्ध असाव्यात, असा प्रयत्न आहे.
साहित्यमय गाडी : गाडीच्या प्रत्येक बोगीला मराठीतील साहित्यिक व कवींची नावे देण्याचा आमचा विचार आहे. तसेच ज्या बोगीला ज्या साहित्यिकाचे नाव दिलेले असेल त्या साहित्यिकाची काही पुस्तके त्या डब्यात ठेवली जातील. तसेच संमेलन संत नामदेव यांच्या घुमानला होणार असल्याने प्रत्येक डब्यात नामदेवांचे साहित्य हे ठेवण्यात येईल. या विशेष गाडीलाही संत नामदेव आणि अन्य एखादे समर्पक नाव देण्याचा आमचा विचार असल्याचे देसरडा यांनी सांगितले. तर आजवर झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा एक वेगळा प्रयोग ठरेल, असे संमेलन आयोजनात महत्वाचा सहभाग असलेल्या ‘सरहद’ या संस्थेचे संजय नहार म्हणाले.