देशात २४ तासांत ८९६ नवे बाधित; जगातील मृत्यू एक लाखाजवळ

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगातील साऱ्या यंत्रणा झगडत असल्या तरीही झपाटय़ाने होत असलेली नव्या रुग्णांची वाढ ही चिंताजनक ठरत आहे. देशभरात २४ तासांमध्ये ८९६ नव्या रुग्णांची भर पडली असून ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्युसंख्या ११० झाली असून जगातील बळींची संख्या १ लाखांवर गेली आहे. देशभरात शुक्रवारी सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहेत.

sassoon hospital marathi news
ऑपरेशन ‘ससून’! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयुक्तांनी हाती घेतली सूत्रे
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद
baba kalyani
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!

मुंबईत २१८ नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील बाधितांची संख्या ९९३ झाली असून, दादरमधील शुश्रूषा रुग्णालयातील दोन परिचारिकांना विषाणूची बाधा झाली. धारावीतील रुग्णांची संख्या वाढून २८ झाली. इंग्रजी वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या एका पत्रकाराला देखील करोनाची लागण झाली.

करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी होत असलेल्या प्रतिबंधात्मक तसेच वैद्यकीय उपायांचा पंतप्रधान कार्यालयाने शुक्रवारी आढावा घेतला. करोनाच्या वैद्यकीय सुविधापूर्तीसाठी केंद्राने ११ उच्चाधिकार गट स्थापन केले आहेत. पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली या गटांची एकत्रित बैठकीत घेण्यात आली. स्थानिक भाषांमधून जनतेला करोनाचे गांभीर्य समजून सांगण्यावर भर देण्यात येणार आहे. या बैठकीचा तपशील मोदींना देण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी सर्व राज्यांना टाळेबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा आदेश दिला आहे. टाळेबंदीच्या वाढीव कालावधीत शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना सवलत दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, बस, रेल्वे व विमानसेवांवरील स्थगिती कायम राहील. शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्था, सार्वजनिक कार्यक्रम यांच्यावरील बंदीही कायम राहणार आहे.

पंतप्रधानांची आज बैठक

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या टाळेबंदीचा कालावधी वाढवण्यासंदर्भात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच टाळेबंदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल. तीन आठवडय़ांच्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत १४ एप्रिल रोजी संपत आहे. मोदी देशाला उद्देशून भाषण करतील आणि त्यात टाळेबंदीच्या नव्या निर्णयाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

देशभरातील स्थिती..

करोना रुग्णांची एकूण संख्या शुक्रवारी ६,७६१ झाली असून एकूण मृत्यू २०६ झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये १६,००२ नमुना चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत एक लाखांहून अधिक नमुना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय ‘आयसीएमआर’ने घेतला आहे. १४ एप्रिलपर्यंत चाचण्यांची संख्या दुपटीने वाढवून २.५ लाख नमुना चाचण्या घेण्यात येणार आहेत. जलद नमुना चाचण्यांची राज्यांना परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात काय? विदर्भात करोनाबाधितांची संख्या वाढली

असून शुक्रवारी एकाच दिवशी १० जणांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पुण्यात ३६ नवे रुग्ण आढळले. मालेगावमध्ये ५ नवे रुग्ण आढळले. राज्यभरातील बाधितांची संख्या १५७४ इतकी झाली आहे.

दादरच्या रुग्णालयातील परिचारिका बाधित

दादरमधील शुश्रूषा रुग्णालयातील दोन परिचारिकांना करोना झाल्याने दादरमधील रुग्णांची संख्या ६ झाली आहे. पालिकेने रुग्णालयातील सर्व परिचरिकांची चाचणी करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच कोणताही नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

वसई-विरारमध्ये ३१ जणांना बाधा

वसईत शुक्रवारी दोन नव्या रुग्णांची नोंद झाल्याने करोनाबाधीत रुग्णांची संख्या ३१ वर गेली. यात विरार मधील एका पोलिसाचा तर वसईतील एका महिलेचा समावेश आहे. मिरा भाईंदर शहरातही एका रुग्णाची भर पडल्याने रुग्णांची संख्या ३० वर गेली आहे.

कळवा-मुंब्य्रात इमारतींना कुलूप

टाळेबंदीला गांभीर्याने न घेणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी कळवा आणि मुंब्रा परिसरातील इमारतींचे प्रवेशद्वार कुलूपबंद करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. या दोन्ही भागांतील करोनाबाधित रुग्णांच्या परिसरातील ५० इमारतींचे प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ठाण्यातील खारकर आळी भागातील घाऊक धान्य बाजारपेठेतील शंभर व्यापाऱ्यांना महापालिकेने नोटिसा बजावून सामाजिक अंतराचा नियम पाळण्याच्या सूचना केल्या आहेत.