मुंबई : दक्षिण मुंबईतील पेडररोड येथील ब्रीच कॅण्डी येथे एका उच्चभ्रू इमारतीत शनिवारी रात्री अचानक आग लागली. पंधरा मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली होती.




ब्रीच कॅण्डी रुग्णालयाजवळ असलेल्या ब्रीच कॅण्डी गृहनिर्माण सोसायटीच्या इमारतीत रात्री आग लागली होती. बाराव्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये ही आग पसरली होती. त्यामुळे बाराव्या मजल्यावर संपूर्ण धूर पसरला होता. अग्निशमन दलाचा ताफा ४ पाण्याचे ट्रँकर, पाच फायर इंजिन, श्वसन उपकरणे यासह घटनास्थळी दाखल झाला होता. अग्निशमन दलाने बचावकार्य हाती घेऊन एक महिला व एका पुरुषाची बाराव्या मजल्यावरून सुटका केली. या दोघांना जिन्याने खाली आणण्यात आले. रात्री साडेअकराच्या सुमारास अग्निशमन दलाने क्रमांक दोनची वर्दी दिली.