मालाड येथे शाळेतील उद्वाहकात अडकून २६ वर्षीय शिक्षिकेचा १६ सप्टेंबरला मृत्यू झाला होता. याप्रकरणी बुधवारी मालाड पोलिसांनी तिघांना अटक केली.जिनल फर्नांडिस असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्यांचे पती बनीफेस फर्नांडीस यांच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी निष्काळजी दाखवल्याप्रकरणी २९ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. मालाड पश्चिममधील एसव्ही रोडवरील चिंचळी सिग्नलजवळ असलेल्या सेंट मेरी इंग्रजी शाळेत १६ सप्टेंबर रोजी दुपारी ही घटना दुर्घटना घडली होती.
हेही वाचा >>>मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या, २३ व्या मजल्यावरुन मारली उडी
मृत शिक्षिका तासिका संपवून सहाव्या माळ्यावर असलेल्या शिक्षक कक्षात जात होत्या. यावेळी उद्वाहकाचे दार बंद होण्यापूर्वीच ते वर गेले. त्यामुळे फर्नांडिस या उद्वहकातच अडकल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांना शाळा प्रशासनाने तातडीने त्यांना बाहेर काढले व लाईफ लाईन या रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शवविच्छेदन अहवालानुसार, गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे नमुद करण्यात आले होते. जिनल फर्नांडिस दोन महिन्यांपूर्वीच या शाळेत सहाय्यक शिक्षिका पदावर रुजू झाल्या होत्या.