मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘बाजीराव’ नामक वाघाने काही दिवसांपूर्वी वन मजूरावर हल्ला केल्याची घटना घडली. दरम्यान, सध्या उद्यानात वन मजूरच प्राणीरक्षकाची भूमिका पार पाडत असून, या घटनेमुळे उद्यानात प्राणीरक्षकाची गरज अधोरेखित झाली आहे.
जून महिन्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारीतील ‘बाजीराव’ वाघाच्या मानेवर जखम झाली होती. त्यामुळे त्याच्यावर व्याघ्रसफारीतील वैद्यकीय पिंजऱ्यात उपचार सुरू होते. एक दिवस पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले वाघावर उपचार करीत होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत वनमजूर आणि एक प्राणीरक्षकही होता.
वाघावर उपचार सुरू असताना वनमजूराने चुकून हात पिंजऱ्याजवळ ठेवला होता. त्यावेळी वाघाने अचानक वनमजूराची बोटे चावली. तात्काळ वनमजूराने हात मागे घेतला. या हल्ल्यात वनमजूराच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना किरकोळ जखम झाली. वनमजूरावर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले.
दरम्यान, उद्यानात प्राणीरक्षकाची भूमिका ही वनमजूरालाच पार पाडावी लागत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तसेच वनमजूराला कोणतेही प्रशिक्षण दिले जात नसल्याने त्यांना अशा वेळी काय काळजी घ्यावी, काय करू नये या गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे त्यांना किमान प्रशिक्षण तरी द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे. यासंबंधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकांशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
प्राणी रक्षकाची भूमिका काय ?
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व्याघ्रसफारी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाअंतर्गत येते. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार उद्यानात प्राण्यांच्या देखभालीसाठी प्राणीरक्षकही ठेवावे लागतात. साफसफाई करणे, प्राण्यांना खायला देणे, तसेच त्यांची दैनंदिन काळजी घेणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे आदी कामे प्राणीरक्षकाला करावी लागतात.