आदेश बांदेकर यांच्या जागी सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाच्या अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली. सदा सरवणकर हे दादर विधानसभेचे आमदार आहेत. मागच्या वर्षीच्या गणेश उत्सवात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात प्रभादेवीत राडा झाला होता. त्यावेळी सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप झाला होता. त्यावर चांगलीच टीकाही झाली होती. मात्र या प्रकरणाच्या चौकशीनंतर त्यांना क्लिन चिट दिली गेली. याआधी आदेश बांदेकर हे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष होते. त्यांनी आता आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय म्हणाले आदेश बांदेकर?
२४ जुलै २०१७ रोजी कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘श्री सिद्धिविनायक मंदिर’ न्यासाचा अध्यक्ष म्हणून सेवा करण्याचा आशीर्वाद मला मिळाला आणि तिथून २३ जुलै २०२३ पर्यंतची ६ वर्षं अविस्मरणीय गेली. न्यासाच्या माध्यमातून, विश्वस्त मंडळाच्या सहकार्यातून अनेक चांगली कामं आणि भाविकांची सेवा करता आली. श्री सिद्धिविनायकाचा महिमा प्रत्यक्ष अनुभवता आला. पण ह्या साऱ्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे १२९ अस्थायी कर्मचारी जे अनेक वर्ष अल्प मानधनात काम करत होते, त्यांची नोकरी कायम व्हावी ह्यासाठी पाठपुरावा करून त्यांना सेवेत कायम करण्याचा! २०१९ सालच्या अंगारक चतुर्थीचा तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. हे काम मी केले नाही, श्री सिद्धिविनायकांनी करुन घेतले. अशी पोस्ट आदेश बांदेकर यांनी केली आहे.
तसंच आदेश बांदेकर यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कर्मचाऱ्यांनी आदेश बांदेकर यांना वाजतगाजत निरोप दिला. तसंच त्यांना खांद्यावर उचलूनही त्यांचं कौतुक केलं. या सगळ्यामुळे आदेश बांदेकर भारावून गेले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं हेदेखील या व्हिडीओत दिसतं आहे.
आदेश बांदेकर हे मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वातले लोकप्रिय अभिनेते आहेत. नाटक, चित्रपट, मालिका अशा माध्यमांत त्यांनी काम केलं आहे. २०१७ पासून सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी ते होते. २३ जून २०२३ पर्यंत त्यांची या पदावर नियुक्ती होती. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यामुळे त्यांच्या जागी सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आदेश बांदेकर यांनी इंस्टाग्राम पोस्ट लिहून आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.