scorecardresearch

“स्वत:ला विकलं, माझी मुंबई…”, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; ठाण्यातील रस्त्यांवरून विचारला सवाल

“४८ टक्के फायदा कंत्राटदारांना करून देण्यात आला”

“स्वत:ला विकलं, माझी मुंबई…”, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; ठाण्यातील रस्त्यांवरून विचारला सवाल
आदित्य ठाकरे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईत शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. खोके सरकार हे फक्त मुंबई विरोधी नाही, तर महाराष्ट्र विरोधी आहे. मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहेत. स्वत:ला विकलं आहे, माझी मुंबई विकू नका, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

आदित्य ठाकरेंनी शिवसेना भवनात प्रसामाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मुंबईतील रस्त्यांच्या कंत्राटावरुन गंभीर आरोप केले. “खोके सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरू केली आहे. पाच हजार रस्त्यांचं कोटींचं टेंडर ही धुळफेक आहे. ४०० किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार ८० कोटी रुपयांचं टेंडर काढलं आहे. १ ऑगस्ट ते १ मे दरम्यान मुंबईतील रस्त्यांची काम केली जाता. मग, फेब्रुवारीत कंत्राट निघालं तर रस्त्यांची काम कधी होणार?,” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : “भाजपाचं नेमकं धोरण काय?”, सत्यजीत तांबेंवर प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “युवानेते म्हणून…”

“या सगळ्या गोष्टी घडत असताना ४८ टक्के फायदा कंत्राटदारांना करून देण्यात आला आहे. महापालिकेत कोणतीही महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकांनी ही कामं मंजूर कशी केली हा प्रश्न मुख्य आहे. कंत्राटांची खिरापत वाटण्यात आली, तो पैसा मुंबईकरांच्या खिशातला आहे. कामाची समज नसतानाही कंत्राट काढण्यात आली,” असं आदित्य म्हणाले.

“मुंबई सगळीकडे क्राँक्रिटचे रस्ते करायचे हे कुठून सुचलं. मुख्यमंत्र्यांना वाटतं दोन वर्षात मुंबईतील रस्ते सिमेंट-क्राँक्रिट होऊ शकतात, मग ठाणे, कल्याण-डोबिंवली, नवी मुंबईतील गल्लीत चांगले रस्ते का नाही झाले. मग प्रत्येकवेळी मुंबईवर राग काढायचा, पैसे लुटायचं,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला.

हेही वाचा : “गद्दार आमदारांनी गोळीबार केल्याचं समोर, पण…”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर आरोप; म्हणाले, “राज्यात मोगलाई आली”

“माझा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. मार्च २०२२ च्या २ हजार कोटींच्या कामाला ३ वर्ष लागणार हे त्यांनी सभागृहामध्ये सांगितलं. मग या सहा हजार कोटींच्या कामाला किती वर्ष लागणार? हे कंत्राट रद्द करुन परत निविदा काढावी,” अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 19:57 IST

संबंधित बातम्या