गेल्या सहा महिन्यात आपल्या राज्यात मोगलाई आली आहे. गद्दार आमदार सदा सरवणकर यांनी गणपतीत पोलीस ठाण्यात गोळीबार केला. काल याचा अहवाल आला की त्यांच्यात बंदुकीतून ती गोळी चालवण्यात आली होती. तरी सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. गद्दार आमदारांनी कोणाला धक्काबुक्की, शिवीगाळ, धमकी देण्याचे प्रकार केले. कोणावरही कारवाई झाली नाही, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर केला.

आदित्य ठाकरे शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, “गेल्या सहा महिन्यांत अधिवेशनात किंवा अन्य वेळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सांगत आहे. पण, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, याच धोरणावर हे सरकार पुढे जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करुनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बदलण्यात आलं नाही. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हे खोके सरकार करत आहे,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

हेही वाचा : “खोके सरकार महाराष्ट्रविरोधी, मुंबईचा वापर चक्क….” आदित्य ठाकरेंचं शरसंधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“धर्म, महापुरुषांबद्दल बोलायचं आणि त्याच्याआडून मुंबई आणि महाराष्ट्राला लुटलं जात आहे. नागपूर अधिवेशनात एनआयटी आणि दोन-तीन घोटाळ्यांबद्दल बोललो. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई किंवा लाज वाटून राजीनामा घेतल्याचं दिसत नाही आहे. ऑगस्ट महिन्यात ५ हजार कोटी रुपयांचं रस्त्याचं कंत्राट काढलं होतं. पण, त्याला कोणताही प्रतिसाद न आल्याने ते रद्द करावं लागलं,” असेही आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.