मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमन याला फाशी देऊन सात वर्ष उलटल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. याकूब मेमनच्या मुंबईतील कबरीचं सुशोभिकरण झाल्याचा मुद्दा भाजपाकडून उपस्थित करण्यात आल्यानंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुंबईत याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपानं शिवसेनेवर टीकास्र सोडलं असताना आता त्यावरून आदित्य ठाकरेंनी टीव्ही ९ शी बोलताना भाजपालाच प्रतिप्रश्न केला आहे. तसेच, निवडणुकांच्या आधी हे असे काही मुद्दे काढून राजकारण केलं जात असल्याचंही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे वाद?

दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते. हा वाद समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या कबरीवरील एलईडी लाईट्स हटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी या मुद्द्यावरून भाजपाला काही सवाल केले आहेत. “एक तर सणाच्या दिवसांमध्ये राजकारण ही एक घाणेरडी गोष्ट झालीये. याप्रकरणातली तथ्य लोकांसमोर यायला हवीत. आरोप करणं सोपं असतं. पण खरं बोलणं कधीकधी कठीण असतं. आज खरं बोलणं गरजेचं आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचं भाजपाला सवाल

“पहिली गोष्ट म्हणजे त्या माणसाचं दफन का झालं? आपण त्याला अतिरेकी म्हणून फाशी दिली. ओसामा बिन लादेनचं समुद्रात दफन झालं. मग याचं एवढं मोठं दफन यांनी का केलं? शिवाय दफन करताना एनओसी घेणं गरजेचं आहे. ती एनओसी कुठेही नाही. महत्त्वाचं म्हणजे ही ट्रस्ट खासगी आहे, महापालिकेचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही”, असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं.

“आपल्या देशात असा कायदा आहे की १८ महिन्यात मृतदेहाचं रोटेशन व्हायला हवं. कारण त्या मृतदेहाचं विघटन व्हायला लागतं. हे का झालं नाही?” असा सवालही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.

मोठी बातमी! दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर मुंबई पोलिसांची कारवाई

“२०१५मध्येच एवढा मानसन्मान का दिला?”

दरम्यान, “हे सगळं होत असताना २०१५ मध्ये एवढा मानसन्मान एका अतिरेक्याला दिला का?” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. “तेव्हा केंद्रात आणि राज्यात कुणाचं सरकार होतं? कदाचित निवडणुका जवळ आल्या म्हणून काहीतरी घडवून आणायचं यामुळे त्यांनी हे केलं असेल. पण थोडी माहिती घेऊन आरोप करणं गरजेचं आहे”, असं ते म्हणाले.

“गेल्या वर्षी औरंगजेबाच्या कबरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित आलं. मग कुणीतरी सांगितलं की ती कबर केंद्र सरकार सांभाळतं. मग ती अजून बंद का नाही झाली? निवडणुका आल्या की वाद निर्माण करायचे, आरोप करायचे. एक वेगळं वातावरण करायचं आणि खोटे आरोप करत राहायचे हे आता देशासमोर यायला लागलं आहे. हे आमच्यावर टीका करत आहेत की त्यांच्या पक्षातल्या ज्यांच्यावर त्यांचा राग आहे, त्यांच्यावर टीका करत आहेत? हे एकदा स्पष्ट झालं तर बरं होईल”, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray slams bjp on yakub memon grave decoration case pmw
First published on: 08-09-2022 at 14:24 IST