-प्रा. डॉ. सुधाकर शेलार

‘महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला खेड्यातून आलेल्या आम्हाला शहरातल्या ‘मॅनर्स’ची माहिती नव्हतीच, पण केवळ तेच नाही, तर एकूणच धमाल जगणे भरभरून जगायला एखादी मैत्रीण शिकवते आणि पुढे जाऊन आयुष्याला गंभीरपणेही घ्यायचे असते, हेही जेव्हा तीच मैत्रीण शिकवते, तेव्हा तुमच्या मैत्रीतली परिपक्वता तुम्हाला मोठे करत जाते.

आम्ही त्या पिढीतले लोक आहोत ज्यांच्या आयुष्यात विद्यालय आणि महाविद्यालय तर होते, परंतु त्या काळी आमच्या खेड्यापाड्यातील वातावरण असे होते की, जर का एखादा ‘मुलगा मुलीशी’ किंवा ‘मुलगी मुलाशी’ बोलली तर लगेच त्यांचे ‘प्रेम प्रकरण’ आहे असे जाहीर केले जायचे. अशा वातावरणातही काही प्रेमप्रकरणे झालीच, नाही असे नाही. मात्र या वातावरणात निखळ स्त्री-पुरुष मैत्रीची शक्यता धूसर होत गेली. त्यामुळे माझ्या बाबतीत विद्यालयीन, महाविद्यालयीन आयुष्यातील मैत्रीण पुढे प्रेयसी झाली आणि नंतर पत्नी झाली. अर्थात खरीखुरी ‘निखळ मैत्रीण’ भेटलीच, पण ती पदव्युत्तर शिक्षण घ्यायला पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गेल्यानंतर…

exam burden on children marathi news
सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
decision to create an independent family is right or wrong
स्वतंत्र संसार थाटण्याचा निर्णय : समंजस की असमंजस?
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

हेही वाचा…संशोधकाची नव्वदी!

ही मैत्री का झाली, कशी झाली? त्याचे नेमके शब्दांकन अवघड आहे; पण प्रयत्न करतो… १९९१ ला बी.ए. झाल्यानंतर एम.ए.साठी मी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. वर्गात चाळीस-पन्नास विद्यार्थी उपस्थित असायचे. बहुतांश विद्यार्थिनी; त्याही पुण्यातल्या बऱ्यापैकी उच्चभ्रू वर्गातून आलेल्या. आम्ही तरुण मात्र खेड्यातून गेलेलो. सुरुवातीला कोपरा धरून बसायचो. पहिली सत्र-परीक्षा झाल्यानंतर माझा वर्गात पहिला क्रमांक आला. त्यानंतर काही लोकांचे लक्ष आमच्याकडे गेले; अर्थात त्यात माधवी आणि मनीषा नव्हत्या, कारण त्या वेळी त्या एम.ए.च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होत्या. पण कॉमनरूममध्ये बसायला लागल्यानंतर कधी तरी मैत्रीचे धागे जुळत गेले असावेत. आता नेमके आठवत नाही. कदाचित त्यांनाही त्यांच्या वर्गात मैत्रीचा परीघ सापडला नसावा आणि आम्हाला तर आमच्या वर्गात नव्हताच. तर अशी ही मैत्रीची सुरुवात… मी नि माधवी आणि नंतर त्यात सामील झाले राम गडकर आणि मनीषा कानिटकर.

आमच्या चौघांत जमीन-अस्मानाचे म्हणता येईल असे आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक अंतर. जगण्याचे आणि भविष्याचे प्रश्नच वेगळे! समान धागा एकच, आम्ही सहाध्यायी होतो! आमच्यातली ही मैत्री एकमेकांची विचारपूस करण्यापासून सुरू झालेली… पण पुढे एकमेकांच्या वाचनापर्यंत आणि अभ्यासापर्यंतच सीमित न राहता आमच्यात जिव्हाळ्याचे मैत्र निर्माण झाले. याच दोन मैत्रिणींनी (माधवी आणि मनीषा) आम्हाला पहिल्यांदा खऱ्याखुऱ्या महाविद्यालयीन जीवनाचा परिचय करून दिला. ‘ऑफ पीरिएड’ला हॉटेलमध्ये (एफ.सी. रोडवरील ‘वैशाली’ आणि ‘रुपाली’) जायचे असते आणि काही खायचे असते हे त्यांनीच आम्हाला स्वखर्चाने शिकवले. इथेच मी पहिल्यांदा डोसा खाल्ला! नवख्या मैत्रिणीसमोर ज्यांनी पहिल्यांदा डोसा खाल्ला असेल त्यांना माझी अवस्था लक्षात आली असेलच! याच मैत्रिणींनी आम्हाला चित्रपटाच्या, नाटकाच्या थिएटरमध्ये जसे नेले, तसे पुण्यातील अनेक नामांकित ग्रंथालयांमध्येही नेले. पुणे नगरवाचन मंदिर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ग्रंथालय, पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय, असे किती तरी. तिथे या दोघींची आधीच ओळख होती. त्यांच्या ओळखीने आमच्याही ओळखी झाल्या. या ओळखींमुळेच आमच्या वाचनाला वेग आला. अनेक संदर्भग्रंथ लीलया उपलब्ध झाले. याच मैत्रिणींनी पुण्यातील अनेक ठिकाणे (अगदी तुळशीबागही) दाखवली!… या दोघींनी आम्हा दोघांना अनेक वेळा त्यांच्या घरी नेले! त्या वेळी त्यांच्या घरातील मोकळे वातावरण बघून आश्चर्य वाटले, हे मात्र नक्की.

हेही वाचा…‘भय’ भूती : वारसा हक्काने मिळालेली भीती

आमच्यात माधवी अधिक समंजस होती. महाविद्यालयीन पर्वात आमच्या या मैत्रीचा (मैत्री आमच्या दृष्टीने निखळ होती तरीही) बभ्रा होतच होता. यावर माधवीचे म्हणणे होते, ‘‘आपण कोण आहोत, आपले संबंध कोणत्या प्रकारचे आहेत, कोणत्या पातळीवर आहेत, हे आपल्याला माहीत आहे; तर त्याबद्दल इतरांची मते विचारात घेऊन चिंतातुर होण्यात अर्थ नाही.’’ त्यामुळेच आम्ही हा मैत्रीचा धागा- अगदी आमचा मित्र रामचे मामा डॉ. निर्मळे हे त्या वेळी फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक होते आणि या दोघींचे विद्यार्थिनी म्हणून त्यांच्याशी फारसे सख्य नसतानाही- टिकवून ठेवला. माधवीच्या समंजसपणाची एक आठवण येथे नमूद करणे आवश्यक आहे. तिने एकदा आम्हाला दिलेला संदेश फार मोलाचा होता. ती म्हणाली, ‘‘आम्ही मुली आहोत. उद्या आमचे करिअर नाही झाले तरी, कोणाशी तरी लग्न करून आम्ही सहज सेटल होऊ शकतो. पण तुमचे तसे नाही. तुम्हाला करिअर करावेच लागेल. त्यामुळे तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. आपली निखळ मैत्री आहे. मित्र-मैत्रिणींमध्येही निखळ मैत्री असू शकते, हेच काही लोकांना कळत नाही. काही दिवसांनी उमजेलही! पण त्यासाठी तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. नाही तर या पोरींच्या नादी लागून तुम्ही वाया गेलात असेच उद्या हेच लोक म्हणायला लागतील!’’ त्या दिवशी ‘रुपाली’तून डोसा खाऊन होस्टेलपर्यंत येताना माधवीने दिलेला हा संदेश मनोमन जपत आम्ही करिअरच्या मागे लागलो. त्याच्याच परिणामस्वरूप असेल आज मी अहमदनगर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख आणि मराठी संशोधन केंद्राचा प्रमुख आहे.

वाढदिवसाला गिफ्ट द्यायचे असते, निदान कार्ड तरी द्यायचे असते. आपल्या मित्रांची परीक्षा संपल्यानंतर त्यांना निदान आईस्क्रीमची ट्रिट तरी द्यायची असते, हे आम्हाला याच मैत्रिणींनी शिकवले. आम्ही ग्रामीण भागातून आलेलो. त्यामुळे या भानगडी आम्हाला माहीतच नव्हत्या. हे सगळे ‘पुणेरी मॅनर्स’ आम्हाला माधवी-मनीषाने शिकवले. त्यांचे आजही आभार!

हेही वाचा…सांधा बदलताना : नव्यातले जुने…

आमच्या या मैत्रीत लिंगभेदानुसार कधी आसक्तीचा भाग आला असेल की नाही, अशी शंका खुद्द आमच्याही मनात अनेकदा येऊन गेली. इतरांचा तर प्रश्नच नाही! पण प्रामाणिकपणे सांगतो, आसक्तीचा भाग आम्ही सुरुवातीपासूनच कटाक्षाने दूर ठेवला होता. त्यामुळेच आजही आम्ही अगदी स्वच्छ मनाने एकमेकांना सहकुटुंब भेटू शकतो… आणि त्याचमुळे आजही आमची मैत्री टिकून आहे! माधवी आज यवतमाळमध्ये असते. ती एका वेगळ्या विचारधारेचे काम करते आहे… मी वेगळ्या विचारधारेचे काम करतो आहे! या विचारधारा आम्ही मैत्रीच्या आड मात्र येऊ दिलेल्या नाहीत. मनीषा सावंतवाडीत असते; तर राम बारामतीच्या ‘विद्या प्रतिष्ठान महाविद्यालया’त प्राध्यापक आहे. आजही आमचा चौघांचा व्हॉट्सअॅप ग्रुप अस्तित्वात आहे. आजही आम्ही ग्रुपवर एकमेकांची खेचत असतो. आमच्या ‘ह्या’ किंवा आमच्या मैत्रिणींचे ‘हे’ त्यात हस्तक्षेप करत नाहीत. कोण म्हणतो स्त्री-पुरुषांमध्ये मैत्रीचे निखळ नाते निर्माण होऊ शकत नाही? आम्ही त्याचे विद्यामान उदाहरण आहोत. आमची मैत्री सच्ची असल्यानेच आमची सच्ची नावे इथे दिली आहेत, इतकेच!

shelarsudhakar@yahoo.com