‘आप’ने लोकसभेसाठी महाराष्ट्रातील सहा उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले असून, त्यात नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा समावेश आहे.
नर्मदा खोऱ्यातील विस्थापित झालेले आदिवासी, प्रकल्पग्रस्त, झोपडपट्टीवासीय यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मेधा पाटकर पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात उतरल्या आहेत. त्यांना ‘आप’ने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. प्रामुख्याने गुजराथी आणि दलित मतदारांचा प्रभाव असणारा हा मतदारसंघ आहे. झोपडपट्टीवासीयांची मोठी संख्या आहे. मेधा पाटकर यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील लढत अटीतटीची होईल, अशी शक्यता आहे.
‘आप’चे मुंबईतील नेते मयांक गांधी यांना उत्तर-पश्चिम मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. दक्षिण-मध्य मुंबईतून केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांच्याविरोधात मीरा संन्याल निवडणूक लढविणार आहेत. समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुणे मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सिंचन क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या विरोधात नोकरीची पर्वा न करता सरकारच्या विरोधात दंड थोपटून उभे राहणारे विजय पांढरे नाशिकमधून निवडणूक लढविणार आहेत. छगन भुजबळ असो किंवा समीर, लोक त्यांना नाकारतील, असा दावा पांढरे यांनी नाशिकमध्ये केला आह़े