मुंबई : पालिकेने चेंबूरच्या सह्याद्री नगर परिसरात वर्षभरापूर्वी आपला दवाखाना उभारण्याचे काम सुरू केले होते. मात्र दवाखान्याच्या उभारणीचे काम अर्धवटच ठेवले. मात्र आता या आपला दवाखानाचे सर्व साहित्यच चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. दोन महिन्यांत येथे आपला दवाखाना उभा न राहिल्यास आंदोलन करण्यात येईल, असा मनसेने इशारा दिला आहे.

हेही वाचा – मनसेचे परप्रांतीयांविरोधातील ‘खळ्ळ्य खट्ट्याक’ बंद ? महायुतीसाठी भाजपची अट

हेही वाचा – मिरजेतील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

झोपडपट्टी आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घराजवळ उपचार मिळावेत यासाठी संपूर्ण राज्यात आपला दवाखाना ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील अनेक झोपडपट्टी भागात पालिकेने आपला दवाखाना सुरू केले आहेत. चेंबूरच्या सह्याद्री नगर (ब) परिसरात १२ ते १५ हजार लोकवस्ती असून पालिकेने येथे आपला दवाखाना सुरू करण्याचे ठरवले होते. त्यानुसार वर्षभरापूर्वी येथे दवाखान्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी हे काम अर्धवट सोडण्यात आले. परिणामी, गेल्या काही दिवसात दवाखान्याच्या उभारणीसाठी आणलेले लोखंडी साहित्य चोरीला गेले आहे. दरम्यान पालिकेच्या एम पूर्व कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाचा इशारा अणुशक्ती विधानसभा उपविभाग अध्यक्ष राजेश पुरभे यांनी दिला आहे.