लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी दरम्यानच्या १२.४४ किमी लांबीच्या मार्गिकेचे ९७.८ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबरअखेरीस पूर्ण करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील विधान भवन आणि चर्चगेट मेट्रो स्थानकांच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्री उशिरा पाहणी केली. कामाबाबत समाधान व्यक्त करीत ही मार्गिका निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येईल, असा दावा त्यांनी केला.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. सुमारे ३३.५ किमी लांबीच्या या मार्गिकेचे दोन टप्प्यात काम करण्यात येत असून दोन्ही टप्पे आणि आरे कारशेडचे काम वेगात सुरू आहे. या मार्गिकेवरील विधान भवन आणि चर्चगेट मेट्रो स्थानकांच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी रात्री ११ नंतर पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पहिल्या टप्प्यातील आरे – बीकेसी दरम्यानच्या मार्गिकेचे ९७.८ टक्के, तर दुसऱ्या टप्प्याचे ७६.८ टक्के काम पूर्ण झाले असून पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस, तर दुसरा टप्पा जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आणखी वाचा-सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका, लोढा यांच्यावरील २०० कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाचे प्रकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मेट्रो ३’च्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्यामुळे मार्गिका अधिक सुरक्षित झाली आहे. अग्निशमन यंत्रणा, भुयारी मार्गिका आदीच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्र्यांनी एमएमआरसीच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सध्या अनेक मेट्रो मार्गिकांची कामे करीत असून या सर्व मार्गिकांच्या कारशेडच्या जागेचा प्रश्न निकाली लागल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.